दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:12 IST2026-01-12T17:11:24+5:302026-01-12T17:12:25+5:30
भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी 2026 ची सुरुवात निराशाजनक ठरली आहे.

दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
श्रीहरिकोटा: भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी 2026 ची सुरुवात निराशाजनक ठरली आहे. आज (12 जानेवारी 2026) रोजी ISROकडून प्रक्षेपित करण्यात आलेले या वर्षातील पहिले PSLV-C62 मिशन तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी ठरले. श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपणानंतर रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात (PS3) चेंबर प्रेशर अचानक कमी झाल्याने, रॉकेट आपल्या ठरलेल्या कक्षेपथापासून भरकटले.
या अपयशात DRDO चा महत्त्वाचा रणनीतिक सर्व्हिलन्स उपग्रह ‘अन्वेषा’, तसेच अन्य 15 लघुउपग्रह अंतराळात हरपल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मे 2025 मधील PSLV-C61 नंतरचे हे ISRO चे सलग दुसरे अपयशी PSLV मिशन ठरले आहे.
स्मूथ लॉन्चनंतर अचानक बिघाड
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 10:18 वाजता PSLV-C62 चे प्रक्षेपण सुरळीत आणि यशस्वी झाले होते. मात्र त्यानंतर पुढील काही मिनिटांत परिस्थिती बदलली. प्रक्षेपणानंतर सुमारे 8 मिनिटांनी तिसऱ्या टप्प्यात कार्यक्षमतेत बिघाड, चेंबर प्रेशरमध्ये अचानक घट आणि आवश्यक थ्रस्ट न मिळाल्याने रॉकेट कक्षेपथापासून भरकटले. यामुळे उपग्रहांना अपेक्षित कक्षेत पोहोचवणे शक्य झाले नाही.
ISRO चेअरमन वी. नारायणन यांचे स्पष्टीकरण
ISRO चे अध्यक्ष व्ही नारायण यांनी मिशननंतर दिलेल्या निवेदनात सांगितले की, “मिशनदरम्यान एक तांत्रिक अडचण निर्माण झाली. सुरुवातीचे फ्लाइट स्टेज पूर्णपणे सामान्य होते. मात्र तिसऱ्या टप्प्यात (PS3) चेंबर प्रेशरमध्ये अचानक घट झाली. त्यामुळे अपेक्षित थ्रस्ट मिळू शकला नाही आणि रॉकेट निर्धारित कक्षेपासून इतरत्र गेले. फेलियर अॅनालिसिस कमिटी सर्व डेटाचा सखोल अभ्यास करणार असून, समान लोड परिस्थितीत फ्लेक्स नोजलची तपासणी करून अपयशाचे मूळ कारण शोधले जाईल."
‘अन्वेषा’सह 16 उपग्रह हरपले
ISRO च्या माहितीनुसार, PSLV-C62 चा मुख्य पेलोड असलेला DRDO चा रणनीतिक सर्व्हिलन्स उपग्रह ‘अन्वेषा’ आणि इतर 15 उपग्रह आता अंतराळात हरपल्याची शक्यता आहे. ISRO अधिकाऱ्यांच्या मते, अंतराळातील प्रचंड व्हॅक्यूममध्ये आणि सुमारे 8,000 किमी प्रतितास वेगाने प्रवास करताना अगदी लहानसा तांत्रिक दोषही मिशन पूर्णपणे नियंत्रणाबाहेर नेऊ शकतो.
यापूर्वीही झालेला बिघाड
PSLV-C62 पूर्वी मे 2025 मध्ये PSLV-C61 मिशनमध्येही असाच बिघाड झाला होता. त्या वेळीही लॉन्च यशस्वी झाला होता, मात्र तिसऱ्या टप्प्यात चेंबर प्रेशर घटले आणि थ्रस्ट कमी झाल्याने उपग्रह कक्षेत पोहोचू शकले नव्हते. सलग दोन वेळा PSLV च्या तिसऱ्या स्टेजमध्येच बिघाड झाल्याने ISRO समोर तांत्रिक पुनरावलोकनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.