दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:57 IST2025-05-22T11:54:47+5:302025-05-22T11:57:53+5:30

दिल्लीसह एनसीआरमध्ये दहशत निर्माण करण्याचा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा कट भारतीय सुरक्षा यंत्रणांनी यशस्वीरित्या उधळून लावला आहे.

ISI spy ring planning a terror strike in Delhi dismantled, 2 in custody | दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात

दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात

राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये दहशत निर्माण करण्याचा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा कट भारतीय सुरक्षा यंत्रणांनी यशस्वीरित्या उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तीन महिन्यांच्या सीक्रेट ऑपरेशननंतर दोन संशयित हेरांना अटक केली आहे. यात नेपाळी वंशाचा एक पाकिस्तानी एजंट आणि झारखंडमधील एक भारतीय नागरिक यांचा समावेश आहे.

तीन महिने चाललेली गुप्त कारवाई
जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत गोपनीय तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान १५ फेब्रुवारी रोजी मध्य दिल्लीतील एका ठिकाणाहून अन्सारुल मियां अन्सारी या नेपाळी वंशाच्या पाकिस्तानी एजंटला अटक करण्यात आली. तो नेपाळमार्गे पाकिस्तानात परत जाण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हाच त्याला पकडण्यात आले.

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण!
अन्सारुल हा मूळचा नेपाळचा असून २००८पासून कतारमध्ये टॅक्सी चालक म्हणून काम करत होता. कतारमध्ये असतानाच तो आयएसआयच्या संपर्कात आला आणि २०२४च्या जून महिन्यात पाकिस्तानातील रावळपिंडी येथे गुप्तचर प्रशिक्षणासाठी गेला. त्याचं प्रमुख उद्दिष्ट भारताच्या लष्करी हालचालींशी संबंधित माहिती गोळा करणं हे होतं.

दुसरा आरोपी रांचीचा रहिवासी
या प्रकरणातील दुसरा आरोपी अखलाक आझम आहे, जो झारखंडमधील रांचीचा रहिवासी आहे. अखलाकने दिल्लीमध्ये अन्सारुलला सर्वतोपरी मदत केली. हे दोघेही सतत पाकिस्तानमधील हँडलर्सच्या संपर्कात होते. मार्च महिन्यात अखलाकला अटक करण्यात आली. अन्सारुलच्या चौकशीतून अनेक लष्करी दस्तऐवज व संवेदनशील माहिती हस्तगत करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करून, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय शहरांवर हल्ल्याचा कट रचला होता, मात्र भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे तो कट फसला.

पाकिस्तानचे नापाक प्रयत्न सुरुच
भारताच्या निर्णायक कारवाईनंतर देखील पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार आणि दहशतवादी हालचाली सुरुच आहेत. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणा या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवून योग्य त्या कारवाया करत आहेत.

Web Title: ISI spy ring planning a terror strike in Delhi dismantled, 2 in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.