लेखः 'सरफरोश'चा गुलफाम हसन, नुसरत मिर्झा आणि डॉ. अन्सारी

By केशव उपाध्ये | Published: July 24, 2022 04:11 PM2022-07-24T16:11:18+5:302022-07-24T16:13:36+5:30

नुसरत मिर्झा यांने जे काही सांगितले त्यातून देशाच्या सर्वोच्च सत्ता वर्तुळात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे असलेले लागेबांधे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

is there any connection between former vice president dr. hamid ansari and pakistan journalist nusrat mirza | लेखः 'सरफरोश'चा गुलफाम हसन, नुसरत मिर्झा आणि डॉ. अन्सारी

लेखः 'सरफरोश'चा गुलफाम हसन, नुसरत मिर्झा आणि डॉ. अन्सारी

googlenewsNext

- केशव उपाध्ये 

आमिर खान अभिनीत १९९९ मध्ये पडद्यावर आलेला सरफरोश आठवतोय का? सरफरोश अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता. जॉन मॅथ्यू मॅथनने कमालीच्या वेगवान आणि उत्कंठावर्धक पद्धतीने दिग्दर्शित केलेला सरफरोश  बॉलीवूडच्या संस्मरणीय चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी नोंद करावा असा ठरला. 'सरफरोश'चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर करण्यात आलेले थेट भाष्य. चित्रपटातील गुलफाम हसन(नसिरुद्दीन शाह) या पाकिस्तानी गझल गायकाचे पात्र सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतात येऊन कसे हेरगिरी करत असे आणि त्याच्या माध्यमातून भारतात वेगवेगळ्या असंतुष्ट समाजघटकांना पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेकडून कसा शस्त्र पुरवठा होतो याचे भेदक चित्रण सरफरोशमध्ये होते. 

गुलफाम हसनच्या भारतातील सत्ताधारी वर्तुळात आणि प्रशासकीय व्यवस्थेत असलेल्या हितसंबंधांचा 'आयएसआय'कडून कसा वापर होतो, यावरही 'सरफरोश'मध्ये टोकदार भाष्य होते. सरफरोशच्या गुलफाम हसनची आठवण माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर एका पाकिस्तानी पत्रकाराने केलेल्या आरोपामुळे वारंवार होऊ लागली आहे. पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी अलीकडेच एका मुलाखतीत माजी उपराष्ट्रपती डॉ.अन्सारी यांच्या निमंत्रणावरून आपण  २००५ ते २०१२ या काळात ५ वेळा भारताचा दौरा केला असे एका मुलाखतीत सांगितले. या दौऱ्यादरम्यान डॉ.अन्सारी यांनी दिलेली गोपनीय माहिती 'आयएसआय'ला दिली असेही नुसरत मिर्झा याने या मुलाखतीत सांगितले आहे. डॉ.अन्सारी यांना उपराष्ट्रपती करण्यात त्यावेळच्या केंद्रातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला होता. २००४ ते २०१४ या काळात देशात दहशतवादाने थैमान घातले होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सत्तेत असताना देशात बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ल्यांना सुमार राहिला नव्हता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मूठभर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी  देशाच्या आर्थिक राजधानीला कसे वेठीस धरले होते, याचे स्मरण सर्वांनाच असल्याने त्याची पुनरुक्ती करत नाही. 

मुद्दा आहे तो भारतातील पाकिस्तान धार्जिण्या शक्तींचा. सरकार आणि प्रशासन व्यवस्थेतील पाकिस्तान धार्जिणी मंडळी दहशतवादाला कळत न कळत कशी मदत करतात यावर 'सरफरोश'मध्ये प्रकाशझोत टाकण्यात आला होता. नुसरत मिर्झा याने आपल्या मुलाखतीत वेगळे सांगितलेले नाही. नुसरत मिर्झा याने इतक्या वर्षांनंतर ही माहिती का जगजाहीर करावी असे प्रश्न काहीजण उपस्थित करतील. मिर्झा याने आताच आरोप का करावेत हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवला तरी त्याने भारताच्या माजी उपराष्ट्रपतींवर गोपनीय माहिती दिल्याचा केलेला आरोप सामान्य भारतीयांना हादरवून टाकणारा आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून नुसरत मिर्झाच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण येणे अपेक्षित होते. जयराम रमेश यांनी मिर्झाच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र हा लेख लिहून पूर्ण होईपर्यंत काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने मिर्झाच्या आरोपाबाबत खुलासा करण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी मिर्झा याच्या आरोपाबाबत तत्काळ खुलासा करत यात काही तथ्य नसल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सत्ताधारी आणि लष्करशहांकडून मिर्झाच्या आरोपांना दुजोरा दिला जाईल हे अपेक्षित नव्हतेच. कारण तसे केले तर त्यांच्या कृष्णकृत्यांची कबुली दिल्यासारखे झाले असते. असो.   

काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीच्या (युपीए) काळात उपराष्ट्रपती असलेले डॉ.हमीद अन्सारी हे देशातील तमाम डाव्या, कथित धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारवंत आणि पत्रकारांच्या गळ्यातले ताईत होते. सलग दहा वर्षे डॉ. अन्सारी हे देशाचे उपराष्ट्रपती पद भूषवत होते. मिर्झा याने केलेल्या आरोपामुळे अत्यंत वरिष्ठ संवैधानिक पद भूषविलेल्या व्यक्तीचे देशप्रेम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आपण नुसरत मिर्झा याला कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण कधीच दिले नव्हते असा खुलासा डॉ. अन्सारी यांनी केला आहे. पण, त्यावर विश्वास कसा ठेवावा?

अन्सारी यांच्याकडून अधिकृतपणे करण्यात आलेल्या खुलाशाच्या चिंधड्या लगोलग उडवल्या गेल्या. त्यावर मात्र, डॉ. अन्सारी अजून व्यक्त झालेले नाहीत. काँग्रेस नेतृत्वाचा चीन आणि पाकिस्तान धार्जिण्या प्रवासाची असंख्य उदाहरणे भूतकाळात सापडतील. दोन वर्षापूर्वी चीनने गल्वान खोऱ्यात केलेल्या घुसखोरीनंतर काँग्रेस नेतृत्वाने भारतीय लष्कराला आणि केंद्र सरकारला पाठिंबा देण्याऐवजी विरोधी सूर लावल्याचे संपूर्ण भारताने पाहिले. चीनच्या घुसखोरीची कल्पना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस नेतृत्वाने आपला देशविरोधी अजेंडा सार्वत्रिक केला. २०१७ मध्ये भूतानमधील डोकलाम मध्ये केलेल्या घुसखोरी वेळीही काँग्रेस नेतृत्वाने केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी मोदी सरकाच्या विरोधात अपप्रचार सुरू केला. मनमोहन सिंग सरकारच्या काळात आणि जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना चीनने घुसखोरी करून बळकावलेल्या हजारो चौरस किलोमीटर भूभागाचा हिशोब देण्याऐवजी मोदी सरकारला देशप्रेमाचे धडे देणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाची वैचारिक दिवाळखोरी अनेकदा जगापुढे आली आहे. आताही डॉ. अन्सारी यांच्या विरोधात पाकिस्तानी पत्रकारच मुलाखत देत असताना त्यांच्या समर्थनाची केविलवाणी धडपड जयराम रमेश यांच्यासारख्या काँग्रेस नेत्याने करावी, याचे मुळीच आश्चर्य वाटत नाही. 

डिसेंबर २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि मानवी हक्क या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादाला नुसरत मिर्झा याला आमंत्रित करण्याचा निर्णय आयोजकांचा होता, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही हा अन्सारी यांचा दावा या कार्यक्रमाचे आयोजक आणि ज्येष्ठ विधिज्ञ अधिश अगरवाला यांनी तातडीने खोडून काढला. त्यावेळी उपराष्ट्रपती असलेल्या डॉ. अन्सारी यांच्या सचिवालयाने मिर्झा यांना या परिसंवादासाठी आमंत्रित करण्याच्या सूचना केल्या होत्या, असे अगरवाला यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी डॉ. अन्सारी आणि मिर्झा यांच्या २००९ मधील एका कार्यक्रमाचे छायाचित्र ही प्रसिद्ध केले आहे. २००९ मध्ये जामा मस्जिद यूनायटेड फ्रंट तर्फे आयोजीत कार्यक्रमाला डॉ. अन्सारी आणि मिर्झा हे व्यासपीठावर उपस्थित असल्याचे या छायाचित्रातून स्पष्ट होते. या छायाचित्राबाबतही डॉ. अन्सारी यांनी अजून तरी खुलासा केलेला नाही. डॉ. अन्सारी यांनी या कार्यक्रमासाठी नुसरत मिर्झा यांना बोलावण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे डॉ. अन्सारी यांच्या सचिवांमार्फत आम्हाला कळविण्यात आले होते. मात्र मिर्झा हे पत्रकार असल्याने व ते पाकिस्तानी असल्याने त्यांना आमंत्रित करणे शक्य नाही असे आयोजकांकडून अन्सारी यांच्या सचिवांना कळविण्यात आले. आम्ही तसे कळवल्यावर डॉ. अन्सारी हे नाराज झाल्याचे त्यांचे सचिव दिवाण यांनी आम्हाला सांगितले, असेही अगरवाला यांनी सांगितले आहे. यावरून काय निष्कर्ष काढायचा हे कॉंग्रेसच्या नेतृत्वानेच सांगितले पाहिजे. 

डॉ. अन्सारी यांच्यावर 'रॉ'च्या एन. के. सूद या निवृत्त अधिकाऱ्याने केलेले आरोप मिर्झा ने केलेल्या गौप्यस्फोटाएवढेच गंभीर आहेत. डॉ. अन्सारी हे इराणमध्ये राजदूत असताना त्यांनी 'रॉ'च्या यंत्रणेची माहिती जगजाहीर करून 'रॉ'च्या अधिकाऱ्यांचे जीव धोक्यात घातले , हा सूद यांचा आरोप डॉ. अन्सारी यांच्याभोवतीचे संशयाचे वलय आणखी गडद करणारा ठरला.

नुसरत मिर्झा यांने जे काही सांगितले त्यातून देशाच्या सर्वोच्च सत्ता वर्तुळात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे असलेले लागेबांधे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पाकिस्तानच्या सहानुभूतीदारांना पाठीशी घालणाऱ्या मंडळींचा भेसूर चेहरा याही पूर्वी समोर आलेला होता. पाकिस्तान मध्ये जाऊन मोदी सरकार हटवण्यासाठी पाकिस्तानने सहकार्य करावे असे धडधडीत देशद्रोही वक्तव्य करणारे मणीशंकर अय्यर असो किंवा नुसरत मिर्झाचा पाहुणचार करणारे डॉ. अन्सारी असो, आयएसआय एवढा धोका या घरच्या मंडळींपासून ही आहे एवढाच याचा अर्थ.  

(लेखक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते आहेत.)

Web Title: is there any connection between former vice president dr. hamid ansari and pakistan journalist nusrat mirza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.