देशात घुसखोरांच्या स्वागतासाठी लाल गालीचा अंथरणे योग्य आहे का?, सुप्रीम कोर्टाने विचारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:02 IST2025-12-03T14:01:31+5:302025-12-03T14:02:33+5:30
मानवी हक्क कार्यकर्त्या रिता मानचंदा यांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत व न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

देशात घुसखोरांच्या स्वागतासाठी लाल गालीचा अंथरणे योग्य आहे का?, सुप्रीम कोर्टाने विचारला सवाल
नवी दिल्ली : भारतात राहणाऱ्या रोहिंग्यांच्या कायदेशीर स्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर प्रश्न उपस्थित केले. भारतातील नागरिक दारिद्र्याशी झुंजत असताना घुसखोरांच्या स्वागतासाठी लाल गालीचा अंथरणे योग्य आहे का? असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला.
अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेले काही रोहिंग्या बेपत्ता झाल्याचा आरोप करून मानवी हक्क कार्यकर्त्या रिता मानचंदा यांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत व न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सवाल उपस्थित म्हटले घुसखोराला सर्व सुविधा देऊ अशी तयारी कोणी दाखवते का? घुसखोराला परत पाठविण्यात काय अडचण आहे?
देशातील गरिबांना लाभ मिळण्याचा हक्क नाही का?
सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, कायद्याचा भंग करून तसेच घुसखोरी करून काहीजण भारतात येतात. येथे आल्यावर आता भारतातील कायदे मला लागू झाले पाहिजे, मला अन्न हवे, आश्रय हवा, माझ्या मुलांना शिक्षण हवे, अशा मागण्या घुसखोर करू लागतात.
भारतातही गरीब लोक आहेत. ते आपले नागरिक आहेत. त्यांना काही सुविधा व लाभ मिळण्याचा हक्क नाही का? मग आधी त्यांच्याकडे लक्ष का देऊ नये? घुसखोर असेल तर त्याचे स्वागत करणे योग्य आहे का?