IPS Couple Success Story: देशात असे अनेक आयएएस-आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांचे पती किंवा पत्नीदेखील आयएएस-आयपीएस आहेत. परंतु पत्नीची एखाद्या जिल्ह्यातून बदली झाली अन् तिच्या जागेवर नवऱ्याची पोस्टिंग झाली, असे क्वचितच घडले असेल. पण, राजस्थानमध्ये असा अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे.
अलीकडेच राजस्थान सरकारने काही IAS, IPS आणि RAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, ज्यात रंजिता शर्मा आणि सागर राणा यांच्या नावांचाही समावेश आहे. हे दोघे पती-पत्नी असून दोघेही आयपीएस अधिकारी आहेत. हे आयपीएस जोडपे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, दौसा जिल्ह्याच्या एसपी रंजिता शर्मा यांची पोलिस मुख्यालयात बदली झाली आहे, तर त्यांच्या जागी पती सागर राणा यांना दौसाचे नवीन एसपी बनवण्यात आले आहे. यापूर्वी सागर राणा जयपूरमध्ये डीसीपी ट्रॅफिक म्हणून तैनात होते.
कोणत्या बॅचचे अधिकारी?रंजिता शर्मा आणि त्यांचे पती सागर राणा दोघेही 2019 बॅचचे IPS अधिकारी आहेत. हरियाणातील रेवाडी येथील रहिवासी असलेल्या रंजिताने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. या परीक्षेत त्यांना 5 वेळा अवयश आले. तीन वेळा प्रिलिम्स आणि दोनवेळा मुलाखतीत नापास झाल्या. पण त्यांनी हार न मानता 2018 साली परीक्षा उत्तीर्ण केली आणि राजस्थान केडरच्या आयपीएस अधिकारी बनल्या. दौसा एसपी बनण्यापूर्वी त्यांनी जोधपूर आयुक्तालयात एसीपी, उदयपूरमध्ये एएसपी, बेहरोद आणि कोटपुतलीमध्ये एसपी म्हणून काम केले होते. आता त्यांना पोलीस मुख्यालयात पाठवण्यात आले आहे.
तर सागर राणाबद्दल बोलायचे झाले तर, तेदेखील हरियाणाचे रहिवासी आहेत. सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केल्यानंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली आणि 2018 मध्येच परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस झाले. त्यांची पहिली पोस्टिंग एसपी संचौर म्हणून झाली होती. याशिवाय ते फलोदीचे एसपीही राहिले आहेत. दौसा एसपी बनण्यापूर्वी ते जयपूर आयुक्तालयात डीसीपी ट्रॅफिक म्हणून कार्यरत होते.