नग्न करुन मारहाण, कंपासने शरीरावर वार; मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयानक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:07 IST2025-02-12T14:54:06+5:302025-02-12T15:07:09+5:30
केरळमध्ये रॅगिंगच्या नावाखाली तीन विद्यार्थ्यांचा अमानूष छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

नग्न करुन मारहाण, कंपासने शरीरावर वार; मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयानक प्रकार
Kerala Crime: केरळमधील कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रॅगिंगची अंगावर काटा आणणारी घटना समोर आलीय. रॅगिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा अमानूष छळ केल्याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांना आधी कपडे काढून नग्न केले आणि नंतर त्यांच्या गुप्तांगावर डंबेल लटकवले. एवढेच नाही तर त्यानंतर कंपासने त्यांच्यावर वार देखील केले होते. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल तीन महिने हा सर्व प्रकार सुरु होता. मात्र हा सगळा त्रास असह्य झाल्यान एका विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना याबाबत सांगितले आणि ही घटना उघडकीस आली.
केरळमधील वैद्यकीय महाविद्यालयातल्या या रॅगिंगच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांवर तीन महिने क्रूर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. कॉलेजच्या तीन ज्युनियर नर्सिंग विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या पाच जणांची या विद्यार्थ्यांना आधी विवस्त्र केले आणि त्यांचे फोटो काढले होते. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यांच्या गुप्तांगाला डंबेल्स लटकवत त्यांच्यावर वार केले. तीन महिने आरोपींनी या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.
नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या या शारिरीक अत्याचाराबद्दल विद्यार्थ्यांनी कोट्टायम गांधीनगर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर आरोपी विद्यार्थ्यांचे निलंबन करुन रॅगिंगविरोधी कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली. पीडित विद्यार्थ्यांना पाचही आरोपींनी नग्नावस्थेत उभं करुन त्यांच्या प्रायव्हेट पार्टला डंबेल लटकवले. कंपाससह तीक्ष्ण वस्तूंचा वापर करून त्यांनी पीडितांनाही जखमा केल्या. यानंतर त्यांनी जखमांवर लोशन लावले, त्यामुळे त्यांना वेदना होऊ लागल्या. पीडित मुलं ओरडायला लागताच आरोपींनी त्यांच्या तोंडात देखील लोशन कोंबले. हा सगळा प्रकार त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. जर आमच्याविरोधात तक्रार केली तर तुमचे करिअर संपवून टाकू अशीही धमकी आरोपींनी दिली होती.
छळ सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना याची माहिती दिली आणि हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं. राहुल राज, एनएस जीवा, एनपी विवेक, रिगिल जीथ आणि सॅम्युअल जॉन्सन अशी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.