पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:48 IST2025-06-09T10:47:07+5:302025-06-09T10:48:15+5:30
Indore Couple Missing Case: सोनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
Indore Couple Missing Case: मेघालयात बेपत्ता झालेल्या इंदूर दाम्पत्याच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. राजा रघुवंशी यांचा मृतदेह दरीत सापडल्यानंतर, आज(९ जून) त्यांची पत्नी सोनम हिला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून अटक करण्यात आली आहे. सोनमनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
सोनमसह मध्यप्रदेश आणि यूपीतील ३ हल्लेखोरांनाही अटक करण्यात आले आहे. एक आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण मध्य प्रदेशातून सुरू होते. सोनम आणि राजा यांचे लग्न ११ मे रोजी इंदूरमध्ये झाले. त्यानंतर २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले. पण मेघालयात पोहोचल्यानंतर दोन दिवसांनी कुटुंबातील सदस्यांचा या जोडप्याशी संपर्क तुटला. दोघांचेही फोन बंद येऊ लागले. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर दोघांना शोधण्यासाठी मेघालयाच्या डोंगरांमध्ये मोहिमा राबवण्यात आल्या. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
मेघालयात राजाचा मृतदेह सापडला
काही दिवसांच्या शोधानंतर सोनमचे जॅकेट झुडुपात सापडले. त्यानंतर दोघांनी भाड्याने घेतलेली स्कूटीही पोलिसांना आढळली. अनेक प्रयत्नांनंतर २ जून रोजी पोलिसांना राजा रघुवंशीचा मृतदेह एका दरीत सापडला. पण सोनम अजूनही बेपत्ताच होती. एकीकडे इंदूरमध्ये राजाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे कुटुंब दुःखात बुडाले होते, तर दुसरीकडे सोनमचे कुटुंब तिच्या परतण्याची आशा करत होते.
अखेर सोनम उत्तरप्रदेशात सापडली
मेघालय आणि मध्यप्रदेशात बरीच शोधाशोध केल्यानंतर सोनम अखेर उत्तरप्रदेशात सापडली. येथील गाजीपूरमध्ये नंदगंजच्या एका ढाबा मालकाचा ११२ क्रमांकावर फोन आला. त्याने पोलिसांना सांगितले की, सोनम ढाब्यात जेवायला आली आहे. यानंतर इंदूर पोलिसांनी गाजीपूर पोलिसांना सोनमला अटक करण्यास सांगितले. युपी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सोनम आणि इतर तीन आरोपींना अटक केले.