इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:42 IST2025-12-12T12:38:19+5:302025-12-12T12:42:51+5:30
Indigo Flight Crisis News: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो या विमान वाहतूक कंपनीमध्ये सुरू असलेल्या घोळाचा फटका देशभरातील लाखो प्रवाशांना बसत आहे. दरम्यान, परीक्षेला जात असलेल्या मुलाचं विमान ऐनवेळी रद्द झाल्यानंतर पित्याने आकाश पाताळ एक करून त्याला नियोजित वेळी परीक्षास्थळी पोहोचवल्याची घटना समोर आली आहे.

इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस...
गेल्या काही दिवसांपासून इंडिगो या विमान वाहतूक कंपनीमध्ये सुरू असलेल्या घोळाचा फटका देशभरातील लाखो प्रवाशांना बसत आहे. विमानं उशिराने उडत असल्याने, ऐनवेळी रद्द होत असल्याने अनेकांना नियोजित वेळी इच्छित स्थळी पोहोचणं कठीण होऊन बसलं आहे. हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील पंघाल कुटुंबातील एका मुलाला इंडिगोच्या या घोळामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र ऐनवेळी विमान रद्द झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी जे काही केलं, त्याचं आता कौतुक होत आहे. तसेच एक बाप आपल्या मुलासाठी काय करू शकतो, हे त्यांनी या अडचणीच्या प्रसंगी दाखवून दिलं.
रोहतकमधील मायना गावातील आंतरराष्ट्रीय नेमबाज आशिष चौधरी पंघाल हा इंदूर येथील एका महाविद्यालयात बारावीचं शिक्षण घेत आहे. परीक्षेपूर्वी काही दिवस आधी तो सुट्टी असल्याने घरी आला होता. दरम्यान, ६ डिसेंबर रोजी त्याला एका पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी व्हायचं होतं. तर ८ डिसेंबरपासून त्याची परीक्षा सुरू होणार होती. या दोन्ही कार्यक्रमांना वेळीच पोहोचता यावे यासाठी त्याने दिल्लीहून इंदूरसाठीच्या इंडिगोच्या विमानाचं तिकीट बुक केलं होतं.
आशिष याला विमानतळावर सोडण्यासाठी त्याचे वडील राजनारायण पंघाल हे दिल्लीत आले होते. मात्र विमानतळावर पोहोचल्यावर त्यांना इंदूरला जाणारं इंडिगोचं विमान रद्द करण्यात आलं असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पंघाल कुटुंबीयांना धक्काच बसला कारण विमान ऐनवेळी रद्द झाल्याने आशिष याला पुरस्कार वितरण सोहळ्यात सहाभागी होता येणार नव्हतं. एवढंच नाही तर त्याला ८ डिसेंबरपासून सुरू होणारी पूर्व परीक्षाही देता आली नसती.
त्यानंतर पंघाल कुटुंबीयांनाी रेल्वे स्टेशनवर जाऊन तत्काळ कोट्यामधून सीट कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला. मात्र इंदूरसाठी सीट मिळणं कठीण होतं. या स्थितीत आशिषचे वडील राजनारायण पंघाल यांनी वेळ वाया न दवडता मोठा निर्णय घेतला. विमान रद्द झालं, ट्रेनमध्ये सिट मिळाली नाही तरी मी मुलाला वेळीच इंदूरला पोहोचवेन असा निश्चय त्यांनी केला.
दिल्लीहून इंदूरपर्यंतचं अंतर सुमारे ८०० किमी आहे. हा प्रवास करण्यासाठी साधारणपणे १२ ते १४ तास लागतात. मात्र वडील राजनारायण यांनी दृढनिश्चय केला आणि कार सुरू करून मुलासोबत इंदूरकडे प्रस्थान केले. वाटेतील अडीअचडणी आणि दीर्घ प्रवासामुळे येणारा थकवा याकडे दुर्लक्ष करत त्यांनी मुलाची परीक्षा चुकू नये यासाठी प्रवास सुरू ठेवला. अखेरीस दुसऱ्या दिवशी सकाळी ते वेळेत इंदूर येथे पोहोचले. या अनुभवाबाबत राजनारायण यांनी सांगितले की, इंदूरला जाणारं विमान अचानक रद्द झाल्याने आम्हाला धक्का बसला होता. मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने परीक्षा महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे मी रात्रभर कार चालवावी लागली तरी मुलाला वेळेत परीक्षा केंद्रामध्ये पोहोचवेन, असा निश्चय केला. शेवटी आम्ही वेळीच इंदूरला पोहोचलो. हीच माझ्यासाठी सर्वात आनंदाची बाब आहे.