Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:54 IST2025-12-06T17:52:42+5:302025-12-06T17:54:23+5:30
इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स कॅन्सल झाल्या आहेत. अनेक लोक विमानतळांवर अडकले आहेत.

Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
देशातील अनेक विमानतळांवर सध्या लोक दुःखी आणि त्रस्त असलेले पाहायला मिळत आहेत. याचं कारण म्हणजे इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स कॅन्सल झाल्या आहेत. अनेक लोक विमानतळांवर अडकले आहेत. दिल्ली विमानतळावर एकाच दिवसात इंडिगोच्या सर्व २३५ देशांतर्गत उड्डाणं रद्द करण्यात आली, तर मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यासारख्या प्रमुख ठिकाणीही याचा मोठा परिणाम झाला.
सोशल मीडियावर याच दरम्यान एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. ज्यामध्ये एक तरुण म्हणतो, "माझं लग्न आहे, मी नवरदेव आहे, पण मी माझ्या स्वतःच्या लग्नालाच जाऊ शकत नाही." अशीच आणखी एक घटना देखील समोर आली आहे. कर्नाटकातील हुबळी येथील एका नवविवाहित जोडप्याला व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहावं लागलं.
नववधू मेधा क्षीरसागर आणि नवरदेव संगम दास हे बंगळुरूहून हुबळी येथे रिसेप्शनसाठी येणार होते, परंतु २० तास उशीर झाल्यानंतर फ्लाइट कॅन्सल करण्यात आली. अखेर ७०० पाहुण्यांशी हे कपल ऑनलाइन कनेक्ट झालं. याच दरम्यान अनेक हृदयद्रावक घटना देखील समोर आल्या आहेत. अनेक लोक विमानतळावर अडकल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागला.
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेल्या हजारो प्रवाशांपैकी नमिता या एक आहेत. अस्थी असलेला कलश घेऊन जाणाऱ्या नमिता सरकारकडे तातडीने हरिद्वारला पोहोचण्यासाठी मदत करण्याची विनंती करत आहेत. नमिता म्हणाल्या की, "मी माझ्या वडिलांच्या अस्थी माझ्यासोबत घेऊन जात आहे. मला आज बंगळुरूहून दिल्ली आणि नंतर देहरादूनला विमानाने जायचं होतं. तिथून मला उद्या माझ्या वडिलांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला जायचं आहे."