डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:30 IST2025-12-06T13:29:55+5:302025-12-06T13:30:36+5:30
IndiGo Flight Cancellations : अस्थी असलेला कलश घेऊन जाणाऱ्या नमिता सरकारकडे तातडीने हरिद्वारला पोहोचण्यासाठी मदत करण्याची विनंती करत आहेत.

फोटो - nbt
इंडिगोच्या ऑपरेशनल क्राइसिसमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात विमानसेवा विस्कळीत झाली आहे. फाइट्स कॅन्सल झाल्यामळे हजारो प्रवासी अडकले आहेत, त्यापैकी अनेकांची महत्त्वाची कामं होती. बंगळुरूमध्ये गुरुवारी ५२ येणाऱ्या आणि ५० जाणाऱ्या फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या. लोकांना यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेल्या हजारो प्रवाशांपैकी नमिता या एक आहेत. अस्थी असलेला कलश घेऊन जाणाऱ्या नमिता सरकारकडे तातडीने हरिद्वारला पोहोचण्यासाठी मदत करण्याची विनंती करत आहेत. नमिता म्हणाल्या की, "मी माझ्या वडिलांच्या अस्थी माझ्यासोबत घेऊन जात आहे. मला आज बंगळुरूहून दिल्ली आणि नंतर देहरादूनला विमानाने जायचं होतं. तिथून मला उद्या माझ्या वडिलांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला जायचं आहे."
"प्रति व्यक्ती ६०,००० रुपये"
"इंडिगोने कोणतीही पूर्वसूचना न देता फ्लाइट रद्द केली. आता ते म्हणत आहेत की आज प्रवास करू शकत नाही आणि दुसऱ्या विमान कंपनीची फ्लाइट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या विमान कंपनीने त्यांच्या किमती लक्षणीयरीत्या वाढवल्या आहेत, प्रति व्यक्ती ६०,००० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत, जे मला परवडत नाही. आम्ही पाच जण आहोत."
"आम्हाला हरिद्वारला पोहोचण्याची व्यवस्था करावी"
नमिताने असाही दावा केला की आता रेल्वे किंवा बसची तिकिटे उपलब्ध नाहीत. कुटुंबाने आधीच हरिद्वार ते जोधपूर, त्यांचे मूळ गाव, असं रेल्वे तिकिट बुक केलं होतं. "आम्ही हरिद्वारला पोहोचू शकत नाही. आमचं रिझर्व्हेशन वाया गेलं आहे. एका आठवड्यानंतर आम्हाला थोडा परतावा मिळेल. किती पैसे कापले जातील हे आम्हाला माहित नाही. माझ्या वडिलांच्या अस्थींचे त्वरित विसर्जन करायच्या असल्याने आम्हाला हरिद्वारला पोहोचण्याची व्यवस्था करावी अशी मी सरकारला विनंती करते" असंही म्हटलं आहे.