IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:26 IST2025-12-06T12:25:10+5:302025-12-06T12:26:56+5:30
IndiGo Flight Viral Video: एका प्रवाशाने विमानात अडकल्याचा व्हिडिओ पोस्ट करून एअरलाइनच्या कारभाराचे वास्तव समोर आणले.

IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या ऑपरेशनल संकटाने आता अधिक गंभीर रूप धारण केले. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे आणि चेन्नईसह अनेक शहरांतील प्रवाशांना तासनतास विमानतळावर ताटकळत बसावे लागत असतानाच, एका प्रवाशाने विमानात अडकल्याचा व्हिडिओ पोस्ट करून एअरलाइनच्या कारभाराचे वास्तव समोर आणले आहे.
प्रवासी सुप्रीत सिंग यांनी पोस्ट केलेला हा इंस्टाग्राम व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात प्रवाशांना कोणतीही स्पष्ट माहिती नसताना इंडिगोच्या विमानात तासन्तास बसावे लागले आहे. सुप्रीत सिंग यांच्या म्हणण्यानुसार, ते आणि इतर प्रवासी विमानात अडीच तास अडकले होते. बोर्डिंगपूर्वी लाउंजमध्ये किमान काही सुविधा उपलब्ध होत्या, पण विमानात प्रवेश केल्यानंतर परिस्थिती अधिक बिकट झाली.
विमानाचे बोर्डिंग सकाळी ११:३० वाजता सुरू झाले. तर, नियोजित लॅन्डिंग वेळ संध्याकाळी ५:३० वाजताची होती. पण दुपारी २:०४ वाजले तरी कॅप्टन विमानात नव्हता. वारंवार विनंती करूनही, प्रवाशांना फक्त एक कप नूडल्स देण्यात आले, जे प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अत्यंत कमी होते. अनेक प्रवासी भूक आणि त्रासामुळे त्रस्त झालेले दिसले, प्रवाशांना क्रूकडून कोणतेही ठोस अपडेट्स मिळत नव्हते. अशी धक्कादायक माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आली.
व्हिडिओमध्ये काही प्रवासी आपापसात वाद घालताना दिसले, तर लहान मुलांसह कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कंटाळलेल्या आणि त्रस्त झालेल्या अनेकांनी प्रवास करण्यास नकार दर्शवला आणि विमानातून खाली उतरण्याची परवानगी मागितली. सुप्रीत सिंग यांनी व्हिडिओच्या शेवटी इतर प्रवाशांना पुढील पाच दिवस इंडिगोने प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला.