भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 08:10 IST2025-08-27T08:09:46+5:302025-08-27T08:10:23+5:30

Indian Army News : भारताची प्रस्तावित हवाई संरक्षण प्रणाली ‘सुदर्शन चक्र’ ही अत्यंत व्यापक स्वरूपाची असून त्यात सेन्सर्स, क्षेपणास्त्रे, देखरेख प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या साधनांचा मोठ्या प्रमाणात एकत्रित वापर अपेक्षित आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी सांगितले.

India's 'Sudarshan Chakra' will be both a shield and a sword, another step towards India's self-reliance | भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल

भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल

महु -  भारताची प्रस्तावित हवाई संरक्षण प्रणाली ‘सुदर्शन चक्र’ ही अत्यंत व्यापक स्वरूपाची असून त्यात सेन्सर्स, क्षेपणास्त्रे, देखरेख प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या साधनांचा मोठ्या प्रमाणात एकत्रित वापर अपेक्षित आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी सांगितले. हा प्रणाली प्रकल्प २०३५ पर्यंत पूर्णत्वास नेण्याची 
योजना आहे.

चौहान म्हणाले की, ही हवाई संरक्षण प्रणाली ढाल आणि तलवार अशा दोन्ही भूमिका निभावणार आहे. इस्रायलच्या ‘आयर्न डोम’सारखी हवामानाच्या कोणत्याही स्थितीत ही प्रणाली कार्यरत राहाणार असून ती क्षेपणास्त्रांपासून उत्तम सुरक्षा पुरवणार आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सुदर्शन चक्र प्रकल्पाचा उल्लेख केला होता. त्या प्रकल्पाबाबत लष्कराने प्रथमच जाहीर वक्तव्य केले आहे. सुदर्शन चक्र ही प्रणाली भारताचा स्वतःचा ‘आयर्न डोम’ किंवा ‘गोल्डन डोम’ असणार आहे, असे  चौहान म्हणाले. (वृत्तसंस्था)

पाकिस्तान या ठिकाणांवर करू शकतो हल्ला
पंतप्रधानांनी सुदर्शन चक्र प्रकल्प जाहीर केल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताच्या सीमावर्ती भागांतील, विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरीसारख्या ठिकाणांवर हल्ल्याचा सूचक इशारा दिला होता. 
या घटकांचा होणार वापर : जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, सुदर्शन चक्र या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये गुप्तचर, देखरेख आणि माहिती संकलन या सर्व घटकांचा समावेश असेल. जमीन, आकाश, समुद्र, जलमय भाग, अवकाश आणि सेन्सर या सर्व गोष्टींतून मिळणाऱ्या माहितीचे विविधांगाने केलेले एकत्रीकरण करून सुदर्शन चक्राचा वापर केला जाईल. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान यांचाही वापर होणार आहे. 

सुदर्शन चक्रची वैशिष्ट्ये...
सुदर्शन चक्र हे भारताच्या हवाई सुरक्षिततेचे भविष्य घडविणारा बहुआयामी प्रकल्प आहे.
केंद्रीय पद्धतीने माहिती संकलन आणि विस्तृत तंत्रज्ञानाचा वापर हे या योजनेचे बलस्थान आहे.
ऑपरेशन सिंदूूरसारख्या यशस्वी मोहिमांमधून मिळालेल्या अनुभवांवर आधारित लष्करी सुधारणा आणि त्यांचा वापर यामुळे या प्रकल्पाला चालना मिळाली.
या प्रणालीद्वारे भारत स्वदेशी, तंत्रज्ञानदृष्ट्या बलाढ्य प्रणाली विकसित करणार आहे. ऊर्जा-आधारित शस्त्रसामग्रीचा वापर केला जाईल. 

 

Web Title: India's 'Sudarshan Chakra' will be both a shield and a sword, another step towards India's self-reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.