पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 06:43 IST2025-08-26T06:42:24+5:302025-08-26T06:43:02+5:30
India-Pakistan Relation: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले.

पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
इस्लामाबाद - पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले.
सिंधू जल कराराच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अशी काही घडामोड झाली का याबाबत दोन्ही देशांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. जम्मूमधील तवी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता भारताने व्यक्त करून पाकिस्तानला सावधानतेचा इशारा दिला. ही माहिती इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाने रविवारी पाकिस्तान सरकारला दिली. मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर भारताने पाकिस्तानशी प्रथमच महत्त्वाच्या कामासाठी संपर्क साधला आहे.
नागरिक झाले सतर्क
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पाकमध्ये जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. पुरामुळे नागरिक सतर्क झाले आहेत.
७८८ पाकिस्तानी नागरिकांचा २६ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत पावसाने मृत्यू.
सतर्क राहण्याचा इशारा ‘राजनैतिक’ का दिला?
भारताने आम्हाला संभाव्य पूरस्थितीबाबत सतर्कतेचा इशारा दिला, अशी माहिती पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिली. मात्र, ही सूचना सिंधू जल करारांतर्गत नेमलेल्या जल आयोगामार्फत न देता, राजनैतिक स्तरावरून देण्यात आली, असे सांगत त्या देशाने नवी कुरापत काढली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान म्हणाले, भारताने तवी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याचा व सतर्क राहण्याचा इशारा राजनैतिक माध्यमातून पाकिस्तानला पाठविला. अशा प्रकारे सूचना देणे हे सिंधू जल कराराचे उल्लंघन आहे.
दहशतवादी, सूत्रधारांना आम्ही सोडत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथे सांगितले की, दहशतवादी व त्यांच्याकडून घातपाती कृत्ये करवून घेणाऱ्या सूत्रधारांवर भारताने कठोर कारवाई केली आहे. रतीय लष्कराच्या शूर जवानांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर अचूक हल्ले चढविले. आम्ही त्या तळांतील दहशतवाद्यांचा नायनाट केला. पहलगाम हल्ल्याचा भारताने कसा बदला घेतला हे साऱ्या जगाने पाहिले आहे. आम्ही अवघ्या २२ मिनिटांत ही कारवाई पार पाडली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.