पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:22 IST2025-11-14T17:21:34+5:302025-11-14T17:22:08+5:30
पाकिस्तानमधील गुरुद्वारांच्या दर्शनासाठी गेलेल्या भारतीय शीख भाविकांच्या जथ्थ्यातील एक महिला बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
श्री गुरु नानक देवजी यांच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने पाकिस्तानमधील गुरुद्वारांच्या दर्शनासाठी गेलेल्या भारतीय शीख भाविकांच्या जथ्थ्यातील एक महिला बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. कपूरथळा येथील रहिवासी असलेल्या सरबजीत कौर या ४ नोव्हेंबर रोजी १९३२ भाविकांच्या जथ्थ्यासह अटारी सीमेमार्गे पाकिस्तानात गेल्या होत्या, मात्र दहा दिवसांनंतर मायदेशी परतलेल्या जथ्थ्यातून त्या बेपत्ता असल्याचे उघड झाले आहे.
बेपत्ता महिलेची ओळख
बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव सरबजीत कौर असून, त्या पंजाबमधील कपूरथळा जिल्ह्यातील पिंड अमैनीपुर, पोस्ट ऑफिस टिब्बा येथील रहिवासी आहेत. ४ नोव्हेंबर रोजी त्या १९३२ भाविकांच्या मोठ्या जथ्थ्यासोबत पाकिस्तानातील विविध गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी गेल्या होत्या.
परतीच्या वेळी गायब
हा जथ्था दहा दिवसांच्या दर्शनानंतर भारतात परतला, मात्र एकूण १९२२ भाविकच परतले. सरबजीत कौर या परत आलेल्या भाविकांमध्ये नव्हत्या. जथ्थ्यातील काही सदस्य आधीच परतले होते. मात्र सरबजीत कौर यांची कोणतीही माहिती न मिळाल्याने त्या बेपत्ता झाल्याची पुष्टी झाली आहे.
इमिग्रेशन फॉर्ममुळे संशय वाढला!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानी इमिग्रेशनवर भरलेल्या फॉर्ममध्ये सरबजीत कौर यांनी आपले राष्ट्रीयत्व आणि पासपोर्ट क्रमांक यांसारखी महत्त्वाची माहिती नमूद करण्यासाठीचे रकाने कोरे सोडल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्यांची ओळख आणि मागोवा घेण्यात अडचणी येत आहेत, तसेच या प्रकारामुळे त्यांच्यावरील संशय वाढला आहे.
भारतीय यंत्रणांकडून तपास सुरू
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित भारतीय तपास यंत्रणांनी सरबजीत कौर यांचा शोध सुरू केला आहे. भारतीय दूतावास तसेच पाकिस्तानातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे, जेणेकरून बेपत्ता महिलेचा लवकर तपास लागू शकेल.