हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:47 IST2026-01-13T14:40:01+5:302026-01-13T14:47:10+5:30
Indian Railway Hydrogen Train Inaugural And Services News: भारतात अशी ट्रेन लवकरच सेवेत येणार आहे, जी वेगाच्या बाबतीत वंदे भारत ट्रेनला आणि वैशिष्ट्यांमध्ये शताब्दी एक्सप्रेससारख्या प्रीमियम ट्रेनला टक्कर देईल, असे म्हटले जात आहे.

हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
Indian Railway Hydrogen Train Inaugural And Services News: आवाज नाही, धूर नाही. भारतात एक अशी ट्रेन धावणार आहे जी वेगाच्या बाबतीत वंदे भारत ट्रेनला टक्कर देईल आणि वैशिष्ट्यांमध्ये शताब्दी एक्सप्रेससारख्या प्रीमियम ट्रेनला टक्कर देईल. परंतु या ट्रेनच्या तिकिटाने सर्वांना आश्चर्यचकित करणारे ठरणार आहे. १५० किमी प्रति तास वेगाने २६०० प्रवाशांना नेणारी ही ट्रेन २६ जानेवारी २०२६ पासून सेवेत येण्याची शक्यता आहे.
आताच्या घडीला भारतीय रेल्वे पायाभूत सुविधा, रेल्वेचे जाळे, ट्रेनचे प्रकार, प्रवासी सुविधा यासंदर्भात अगदी वेगाने काम करत आहे. राजधानी, शताब्दीनंतर आता वंदे भारत ट्रेनचे युग भारतीय रेल्वेत आले आहे. वंदे भारत ट्रेनच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर आता बहुप्रतिक्षित स्लीपर वंदे भारत ट्रेन १७ जानेवारी २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे. याहीपेक्षा एक पाऊल पुढे टाकत आता भारतीय रेल्वेने हायड्रोजन ट्रेन तयारी केली आहे.
हा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी मोठा टप्पा ठरेल
जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनने रेल्वेसाठी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. यानंतर आता भारतीय रेल्वेने हायड्रोजनवर चालणारी देशातील पहिली ट्रेन चालवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. देशाची पहिली हायड्रोजन ट्रेन RDSO (रिसर्च, डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन) च्या मानकांनुसार संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात आली आहे. या ट्रेनचे एकमेव उत्सर्जन जलवाष्प असल्याने ती पूर्णपणे शून्य-कार्बन उत्सर्जन तंत्रज्ञानावर आधारित राहील. हायड्रोजन ट्रॅक्शन हे नेक्स्ट-जनरेशन फ्यूल तंत्रज्ञान असून, हा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी मोठा टप्पा ठरेल.
सर्वात शक्तिशाली आणि सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन
डिझेल इंजिनची जागा विजेवर चालणाऱ्या इंजिननी घेतली आहे. आता या इलेक्ट्रिक इंजिनची जागा हायड्रोजनवर चालणाऱ्या इंजिनाने घेतली तर नवल वाटायला नको. हायड्रोजनवर चालणारी ही ट्रेन सर्वात शक्तिशाली आणि सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असणार आहे. या ट्रेनमध्ये ८ ते १० प्रवासी कोच असणार आहेत. अलीकडेच रेल्वेने या इंजिनची यशस्वी चाचणी केली. हे इंजिन चेन्नईतील कारखान्यात तयार करण्यात आले आहे. ही रेल्वे जगातील सर्वात शक्तिशाली असणार आहे. ही रेल्वे २६०० प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असणार आहे. पर्यावरणाला अनुकुल असलेली ही पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे. अशाप्रकारच्या ३५ ट्रेन बनविण्यात येणार आहेत. ज्या देशातील विविध भागात सुरु केल्या जाणार आहेत.
हायड्रोजन ट्रेनमध्ये प्रवाशांना कोणत्या सुविधा मिळणार?
भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन २६ जानेवारी २०२६ रोजी सेवा सुरू करण्याची अपेक्षा आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु, हायड्रोजन ट्रेनची चाचणी पूर्ण झाली आहे. विमानासारखा प्रवास अनुभव देणारी ही हायड्रोजन ट्रेन ताशी १५० किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे. एक किलो हायड्रोजन इंधनावर ही ट्रेन २ किमी अंतर कापू शकणार आहे, असे म्हटले जात आहे. हायड्रोजन ट्रेनच्या डब्यांमध्ये तापमान सेन्सर, आधुनिक शौचालये आणि वॉशबेसिन आहेत. आरामदायी निळ्या सीट, आधुनिक व्हेंटिलेशन सिस्टिम, एलईडी लाइट पॅनेल, मेट्रोप्रमाणेच स्लाइडिंग दरवाजे आणि आधुनिक बायो-टॉयलेट अशा अनेक सुविधा देण्यात येत आहेत. हायड्रोजन ट्रेन नेव्ही ब्लू आणि पांढऱ्या रंगात असेल.
दरम्यान, हायड्रोजन ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन सेल असतो, जो हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अभिक्रियेतून वीज निर्माण करतो. या प्रक्रियेत पाणी (H₂O) आणि ऊर्जा निर्माण होते. यामुळे ही ट्रेन पर्यावरणासाठी अतिशय स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठरते. जगातील फक्त चार देशांमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन आहेत. भारताच्या ट्रेनची ताकद याच्या दुप्पट असून भारत जगातील पाचवा देश ठरणार आहोत. या हायड्रोजन ट्रेनचा तिकीट दर किमान ५ रुपये आणि कमाल भाडे २५ रुपये असू शकते. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.