indian foreign office tells justine trudeaus Do not try to focus on internal matters of Indian | अंतर्गत प्रकरणांत दखल देण्याचा प्रयत्न करू नका; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची कॅनाडाच्या पंतप्रधानांना समज

अंतर्गत प्रकरणांत दखल देण्याचा प्रयत्न करू नका; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची कॅनाडाच्या पंतप्रधानांना समज

नवी दिल्ली -कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. यासंदर्भात, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिव्र प्रतिक्रिया देत, भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल देण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दात ट्रुडो यांना समज दिली आहे. एवढेच नाही, तर देशातील राजकीय वर्तुळातूनही तिव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव  ट्रुडो यांच्या वक्तव्यावरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, 'आपल्या भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची वक्तव्ये बघितली, जी चुकीच्या माहितीवर आधारलेली आहेत. अशाप्रकारच्या वक्तव्यांना कसल्याही प्रकारचा अर्थ नाही. विशेषतः जेव्हा प्रश्न एखाद्या लोकशाही देशातील असतो. मुत्सद्देगीरीच्या पातळीवरील चर्चेला राजकीय हेतूने चुकीच्या पद्धतीने ठेऊ नये.'

याशिवाय, भाजप नेते राम माधव यांनीही ट्रुडो यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तर, शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्रुडो यांना भारताच्या अंतर्गत बाबींवर आपली राजकीय पोळी भाजू नका, अशी समज दिली आहे. राम माधव यांनी,  ट्रुडो यांच्या भारतांतर्गत बाबींवर भाष्य करण्याच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'त्यांची लायकी काय आहे? हे भारताच्या सार्वभौम प्रकरणात हस्तक्षेप केल्यासारखे नाही?

तर, प्रियंका चतुर्वेदी यांनी जस्टिन  ट्रुडो यांना टॅग करत ट्विट केले आहे, की 'प्रिय जस्टिन ट्रुडो, आपल्या चिंतांमुळे अत्यंत प्रभावित झाले. मात्र, भारतांतर्गत बाबी कुण्या दुसऱ्या देशाच्या राजकारणाचा चारा बनू शकत नाही. कृपया इतर देशांप्रती आमच्या शिष्टाचाराच्या भावणेचा सन्मान करा.' शिवसेना प्रवक्ता चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्याच ट्विटमध्ये टॅग करत शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, 'पंतप्रधानांना आग्रह आहे, की इतर देशांच्या नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यापूर्वी, यावर काही तरी मार्ग काढा.'

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: indian foreign office tells justine trudeaus Do not try to focus on internal matters of Indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.