परदेशगमन वाढले; गेल्या पाच वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले, कोणत्या देशांकडे ओढा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:07 IST2025-12-18T12:07:31+5:302025-12-18T12:07:52+5:30
Indian Citizenship: कोव्हिडनंतर परदेशगमनात वाढ; केंद्राची संसदेत माहिती

परदेशगमन वाढले; गेल्या पाच वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले, कोणत्या देशांकडे ओढा?
Indian Citizenship: दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भारतीय आपले नागरिकत्व सोडत असल्याचे चित्र समोर आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत 9 लाखांहून अधिक भारतीयांनी नागरिकत्वाचा त्याग केला आहे. विशेष म्हणजे 2022 पासून दरवर्षी ही संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. 2011 ते 2024 या कालावधीत एकूण 20.6 लाख (2.06 मिलियन) भारतीयांनी नागरिकत्व सोडले असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक लोकांनी हे पाऊल गेल्या पाच वर्षांत उचलले आहे.
कोव्हिडनंतर संधी मिळताच परदेशगमन
कोव्हिडपूर्व काळात जवळपास दहा वर्षे दरवर्षी सरासरी 1.2 ते 1.45 लाख भारतीय नागरिकत्व सोडत होते. मात्र 2020 मध्ये, प्रवासावरील निर्बंधांमुळे ही संख्या सुमारे 85 हजारांवर आली. कोव्हिडनंतर निर्बंध हटताच पुन्हा एकदा परदेशगमन वाढले आणि 2022 पासून दरवर्षी 2 लाखांपेक्षा अधिक भारतीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला.
नागरिकत्व का सोडत आहेत ?
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नागरिकत्व सोडण्यामागील कारणे ‘वैयक्तिक’ असून ती संबंधित व्यक्तीलाच माहीत असतात. बहुतांश लोक ‘वैयक्तिक सोय’ आणि जागतिक पातळीवरील संधींसाठी परदेशी नागरिकत्व स्वीकारतात. ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या काळात जागतिक कार्यक्षेत्रातील संधी भारत मान्य करतो, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
दुहेरी नागरिकत्वाचा अभाव हा मोठा मुद्दा
भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाची सुविधा नसणे हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. नागरिकत्व कायदा, 1955 च्या कलम 9 नुसार, एखाद्या भारतीयाने परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते. परदेशी नागरिकत्वामुळे मतदानाचा हक्क, सामाजिक सुरक्षा, कायमस्वरूपी निवास, सरकारी नोकऱ्या आणि दीर्घकालीन स्थिरता मिळते. भारताचा ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया (OCI) कार्ड व्हिसामुक्त प्रवास आणि काही आर्थिक हक्क देतो, मात्र मतदान किंवा निवडणूक लढवण्यासारखे राजकीय अधिकार देत नाही.
परदेशात चांगल्या नोकरीच्या संधी
सोशल मीडियावर अनेक जण सांगतात की परदेशात चांगल्या करिअर संधी मिळवण्यासाठी नागरिकत्व सोडावे लागते, मात्र भारतीय ओळख सोडणे भावनिकदृष्ट्या कठीण असते. सध्या हा ट्रेंड केवळ मध्यमवर्गापुरता मर्यादित नसून, श्रीमंत वर्गातही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
भारतीय नागरिक कुठे जात आहेत?
भारतीय नागरिकत्व सोडणारे बहुतांश लोक अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडे वळत आहेत. या देशांचे पासपोर्ट अधिक आकर्षक असून रोजगार, शिक्षण आणि स्थिरतेच्या अधिक संधी उपलब्ध आहेत.