भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 02:12 IST2025-05-17T02:11:30+5:302025-05-17T02:12:56+5:30
भारत आता पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढविण्याच्या तयारीत आहे. दौरा कधीपासून होणार सुरू?

भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारताच्या लष्कराने पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्यानंतर भारत सरकार आता ‘डिप्लोमॅटिक’ पद्धतीने पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढविण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे ठसवण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी जगातील प्रमुख ७-८ देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याची केंद्रातील मोदी सरकारची योजना आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीतील सर्वपक्षीय सदस्यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल. एका शिष्टमंडळात पाच-सहा खासदार असतील. अशा ७-८ शिष्टमंडळांना वेगवेगळ्या देशात पाठविले जाणार आहे.
दौरा कधीपासून होणार सुरू?
परराष्ट्र मंत्रालय या योजनेत समन्वयकाची भूमिका बजावत असून शिष्टमंडळांचा हा दौरा २२ मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांशी चर्चा करून शिष्टमंडळात सहभागी करण्यासाठी खासदारांची नावे परराष्ट्र मंत्रालय निश्चित करीत आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हेही खासदारांशी संपर्क साधत आहेत.
या खासदारांचा समावेश शक्य
परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीत एकूण ३१ सदस्य असून काँग्रेसचे खासदार शशी थरूर याचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातून उद्धवसेनेचे अरविंद सावंत आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सदस्य आहेत. याशिवाय सलमान खुर्शीद, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आदी खासदारांशी संपर्क साधण्यात आला असल्याचे समजते.