'त्या करारात नेमकं काय, कळायला हवं', भारत-अमेरिका ट्रेड डीलवर शशी थरूर स्पष्ट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:47 IST2026-02-03T14:46:51+5:302026-02-03T14:47:19+5:30
India-US Trade Deal: अमेरिकेने भारतावर लादलेला 50 टक्के कर, 18 टक्क्यांवर आणला आहे.

'त्या करारात नेमकं काय, कळायला हवं', भारत-अमेरिका ट्रेड डीलवर शशी थरूर स्पष्ट बोलले
India-US Trade Deal: बहुप्रतिक्षित भारत-अमेरिका ट्रेड डील जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून यावर टीका आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, काँग्रेस नेते शशि थरूर यांनी या करारावर संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय वस्तूंवरील कर 50 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, गुंतवणूक आणि निर्बंधांबाबत काही महत्त्वाचे सवालही उपस्थित केले आहेत.
टॅरिफ कमी होणे चांगली बाब, पण...
शशि थरूर म्हणाले, त्या करारात नेमकं काय आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. विरोधी पक्ष फक्त स्पष्टता मागत आहे. करारात काय, हेच आम्हाला माहीत नाही. आपल्याकडे फक्त ट्रम्प आणि पीएम मोदींचे ट्विट आहे. संसदीय लोकशाहीत हे पुरेसे आहे का? भारत सरकारने देशातील जनतेला या करारात काय आहे, हे समजावून सांगितले पाहिजे की नाही? या करारात नेमकं काय आहे, हे पूर्णपणे समजल्यावरच आपण खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त करू शकतो. मात्र कर 50 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला, ही नक्कीच चांगली बाब आहे.
#WATCH | Delhi | On India-US trade agreement, Congress MP Shashi Tharoor says," I want to know what it contains. The Opposition is only asking for clarity. We don't know what the deal contains. We have Mr Trump's tweet and Mr Modi's tweet; is that enough in a parliamentary… pic.twitter.com/2XJMnnIUZu
— ANI (@ANI) February 3, 2026
गुंतवणुकीवर आणि निर्बंधांवर शंका
थरूर पुढे म्हणाले, ट्रम्प म्हणतात की हा करार शेतीसाठी आहे, मग भारतीय शेतकऱ्यांना काय मिळणार? डोनाल्ड ट्रम्प 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक होईल, असे सांगत आहेत. मात्र हा पैसा नेमका येणार कुठून? आपली संपूर्ण आयात 700 अब्ज डॉलर्स आहे. मग आपण इतर सर्व देशांकडून खरेदी करणे थांबवणार आहोत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
एनडीएचा जल्लोष, मोदींचा दावा...
दरम्यान, ट्रेड डीलच्या घोषणेनंतर संसदेत एनडीए नेत्यांनी जल्लोष केला. संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, हा करार आमच्या कूटनीतीचा मोठा विजय आहे. यावरून हे सिद्ध होते की, संयम ठेवला तर त्याचे फळ नक्की मिळते.
काय आहे भारत-अमेरिका करार?
या करारानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील एकूण टॅरिफ 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. तसेच, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे लावण्यात आलेला 25 टक्के दंडात्मक टॅरिफही हटवण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, भारत भविष्यात रशियाकडून तेल खरेदी कमी करेल किंवा थांबवेल आणि त्याऐवजी अमेरिका व व्हेनेझुएलाकडून तेल आणि गॅस खरेदी वाढवेल.
भारताकडून 500 अब्ज डॉलरच्या खरेदीची तयारी
या करारांतर्गत भारताने पुढील काही वर्षांत अमेरिकेकडून ऊर्जा (कोळशासह), तंत्रज्ञान, कृषी उत्पादने यांची 500 अब्ज डॉलरपेक्षा अधिक खरेदी करण्याचा संकल्प केला आहे. या ट्रेड डीलमुळे रत्न-आभूषण, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण (फार्मा) आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.