भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 06:50 IST2025-10-12T06:49:38+5:302025-10-12T06:50:45+5:30
व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनल येथे बोलताना अदानी म्हणाले की, विदेशातील लोक काय बोलतात यावर भारताने आता अवलंबून राहू नये. मौन म्हणजे विनम्रता नव्हे, तर ती शरणागती आहे.

भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
नवी दिल्ली : हिंडेनबर्ग अहवालाचा एखाद्या हत्यारासारखा वापर झाला. त्यामुळे अदानी समूहाचे सुमारे ८८ हजार कोटी रुपयांचे बाजारमूल्य संपुष्टात आले. ही घटना साऱ्या देशासाठी डोळे उघडणारी ठरली असे अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले. या अहवालाचा वापर करून अदानी समूहावर अतिशय नियोजनबद्ध रीतीने हल्ले चढविण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनल येथे बोलताना अदानी म्हणाले की, विदेशातील लोक काय बोलतात यावर भारताने आता अवलंबून राहू नये. मौन म्हणजे विनम्रता नव्हे, तर ती शरणागती आहे. गांधी आणि स्लमडॉग मिलियनेअरसारख्या चित्रपटांचा दाखला देत अदानी म्हणाले, भारताच्या या कथा पाश्चात्त्यांनी त्यांच्या नजरेतून सांगितल्या. त्यामुळे यापुढे आपण कोण आहोत हे स्वत:च सांगितले नाही, तर इतरजण आपल्याबद्दलची कथा त्यांच्या दृष्टिकोनातून सांगतील.
भारताने चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर स्वतःची कहाणी व स्वतःचा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला पाहिजे. भारताने मनात अहंकारभाव न ठेवता प्रामाणिकपणे तसेच कोणताही प्रचारकी थाट न बाळगता स्वत:ची कहाणी सर्वांना सांगितली पाहिजे.
‘अमेरिकी चित्रपट देशाच्या प्रभावाची कथा सांगतात’
अदानी म्हणाले की, अमेरिकी चित्रपट त्यांच्या राष्ट्राभिमानाची, सैन्याची, व्यापाराची आणि जगभरातील प्रभावाची कथा सांगतात. स्वतःची कहाणी प्रभावीरीत्या सांगणारा देशच जगाचे नेतृत्व करतो. विविध चित्रपटांतून अमेरिकेने आपले सैन्य, विचारसरणीला यांचे दर्शन जगाला घडविले. त्य़ाप्रमाणे भारतानेही जगात स्वतःची सर्जनशील ओळख निर्माण केली पाहिजे.