आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:45 IST2025-10-16T12:45:23+5:302025-10-16T12:45:53+5:30

India-Russia Relation: भारत यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

India-Russia Relation: We will think about our country first; India's clarification on Donald Trump's 'Russian Oil' claim | आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती

आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती

India-Russia Relation: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या इंधन खरेदीवर केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हाईट हाउसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, “भारत यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भारत आणि रशियाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी स्पष्ट केले की, भारताचे तेल आणि वायू आयात धोरण पूर्णपणे देशातील नागरिकांच्या हितांवर आधारित आहे. त्यांनी ट्रंपच्या दाव्याचे थेट खंडन केले नसले तरी म्हटले की, भारत हा तेल आणि गॅसचा महत्त्वाचा आयातदार आहे. जागतिक ऊर्जा परिस्थिती अस्थिर असताना भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे आमचे प्राधान्य आहे. आमची ऊर्जा धोरणे स्थिर दर आणि सुरक्षित पुरवठ्यावर आधारित आहेत.

अमेरिकेबाबत काय म्हटले?

जायसवाल यांनी पुढे सांगितले की, स्थिर ऊर्जा दर आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे, हे आमच्या ऊर्जा धोरणाचे दोन मुख्य उद्दिष्ट आहेत. यामध्ये आमच्या ऊर्जा स्त्रोतांचा विस्तार करणे आणि बाजाराच्या परिस्थितीनुसार त्यात विविधता आणणे यांचा समावेश होतो. अमेरिकेबाबत बोलायचे झाल्यास, आम्ही अनेक वर्षांपासून ऊर्जा खरेदी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या दशकात यात सातत्याने प्रगती झाली आहे. सध्याच्या अमेरिकन प्रशासनाने भारतासोबत ऊर्जा सहकार्य अधिक मजबूत करण्याची इच्छा दर्शवली आहे. या संदर्भातील चर्चा सुरू आहेत.

रशियाची प्रतिक्रिया

रशियाचे भारतातील राजदूत डेनीस अलीपोव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, रशिया भारतासाठी किफायतशीर बाजार पर्याय आहे. भारत रशियाकडून सुमारे एक-तृतीयांश कच्चे तेल खरेदी करतो. मात्र, त्यांनी भारताने तेल खरेदी थांबवली आहे का, यावर काही भाष्य केले नाही.

काँग्रेसचा मोदींवर हल्ला

ट्रम्पंच्या दाव्यानंतर काँग्रेसने सरकारवर टीका केली. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, ट्रम्प यांनी अनेक वेळा दावा केला आहे की, ते भारत-पाकिस्तान तणाव थांबवण्यासाठी जबाबदार आहेत. आता ते म्हणतात की, मोदींनी त्यांना आश्वासन दिले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. जर हे खरं असेल तर पंतप्रधानांनी हे अधिकृतपणे जाहीर करावे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदींवर टीका करत म्हटले की, मोदी ट्रम्पच्या दबावाखाली आहेत. काँग्रेसचा आरोप आहे की, मोदींनी पुन्हा एकदा “देशाच्या सन्मानाचा सौदा” केला आहे.

रशिया-युक्रेन युद्धानंतर तेल खरेदीत वाढ

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदीत मोठी वाढ केली. युद्धापूर्वी भारताचा रशियन तेलातील वाटा केवळ 1% होता, पण तो वाढून आता सुमारे 40% पर्यंत पोहोचला आहे. यामागचे कारण म्हणजे, रशियन तेलावर मिळणारी मोठी सवलत. पश्चिमी निर्बंधांमुळे आणि युरोपियन मागणी घटल्यामुळे रशियाने भारताला स्वस्त दरात तेल पुरवणे सुरू केले. चीननंतर भारत हा रशियन कच्च्या तेलाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे.

रशियन तेलामुळे भारतावर ज्यादा कर...

भारतावर अमेरिकेने लावलेल्या 50% टॅरिफ मागेही रशियन तेल खरेदीचाच मुद्दा आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीला भारतावर 25% परस्पर कर लावला होता, जो नंतर वाढवून 50% करण्यात आला. ट्रम्प सरकारचे म्हणणे आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करून अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला आर्थिक मदत करत आहे. त्यामुळे भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आला आहे.

Web Title : ट्रंप के रूसी तेल दावे पर भारत का स्पष्टीकरण: राष्ट्रहित सर्वोपरि।

Web Summary : भारत ने कहा कि उसकी तेल नीति नागरिकों के हितों को प्राथमिकता देती है, ट्रंप के रूसी तेल आयात रोकने के दावे के बीच। रूस ने व्यापार को फायदेमंद बताया, जबकि कांग्रेस ने मोदी पर दबाव में राष्ट्रीय सम्मान से समझौता करने का आरोप लगाया।

Web Title : India clarifies after Trump's claim on Russian oil purchase.

Web Summary : India asserted its oil policy prioritizes citizens' interests amid Trump's claim it would halt Russian oil imports. Russia stated trade is beneficial, while Congress criticized Modi, alleging a compromised national honor due to pressure.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.