'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:51 IST2025-11-20T18:40:44+5:302025-11-20T18:51:16+5:30
India-Russia Relation: पुतिन डिसेंबरमध्ये भारतात येणार; जागतिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!

'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
India-Russia Relation: रशिया-भारत संबंध सध्या मोठ्या दबावाचा सामना करत आहेत. अमेरिकेसह पाश्चात्य देशांना भारतानेरशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे असे वाटते. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर यामुळे भारतावर अतिरिक्त 25 टक्के शुल्क लादले आहेत. असे असूनही, भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी TASS ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पाश्चात्य अडथळ्यांना न जुमानता रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार राहिला आहे. आम्ही भारताला ऊर्जा संसाधनांच्या खरेदीसाठी चांगले करार देण्यास तयार आहोत. त्यांची ही प्रतिक्रिया अशावेळी आले आहे, जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याची चर्चा सुरू आहे.
पश्चिमी दबावातही भारत-रशिया संबंध ठाम
रोसनेफ्ट आणि लुकोइल सारख्या रशियन तेल कंपन्यांवरील अमेरिकेच्या निर्बंधांचा संदर्भ देत रशियन राजदूत म्हणाले की, रोसनेफ्ट आणि लुकोइलवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे तेल पुरवठ्यावर निश्चितच परिणाम होऊ शकतो. तरीही भारताला प्राधान्य देणे हे रशियाचे धोरण कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिमी दडपशाहीला भारताने ठामपणे उत्तर दिले
रशिया-भारत संबंधांवर पाश्चिमात्य दबाव नाकारत अलिपोव्ह यांनी म्हटले की, भारताने रशिया-भारत संबंधांना कमकुवत करण्याच्या आणि महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर आपली भूमिका लादण्याच्या पाश्चिमात्य प्रयत्नांना ठामपणे विरोध केला आहे. त्यांनी जोर देऊन सांगितले की, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला मागे टाकून लादलेल्या एकतर्फी, बेकायदेशीर निर्बंधांना मान्यता देत नाही. BRICS आणि SCO सारख्या मंचांमध्ये दोन्ही देशांसाठी मोठ्या संधी असल्याचेही त्यांनी म्हटले.
नवीन सहकार्याच्या दिशा उघडल्या
रशियन राजदूतांच्या मते निर्बंधांदरम्यानही भारत-रशिया यांच्यात सहकार्याच्या नव्या शक्यता निर्माण होत आहेत. रशियन बाजारपेठ भारतीय सीफूड आणि इतर वस्तूंसाठी मोठी संधी बनत आहे. संयुक्त खत उत्पादन क्षेत्रातही दोन्ही देशांत मोठी क्षमता आहे. अलिपोव यांनी सांगितले की, प्रस्तावित शिखर परिषदेत ऊर्जा सुरक्षेपासून ते व्यापार वाढीपर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ही बैठक भारत-रशिया सहकार्याला नव्या उंचीवर नेईल.