भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 20:53 IST2025-05-15T19:58:30+5:302025-05-15T20:53:32+5:30
India Turkey Relations: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने चांगलाच दणका दिला.

भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने चांगलाच दणका दिला. भारताने देशांतील प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा देणारी तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे ब्युरो ऑफ एव्हिएशन सिक्युरिटीकडून स्पष्ट करण्यात आले.
भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या लष्करी संघर्षादरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. यामुळे भारत आणि तुर्कीमधील संबंधांमध्ये पुन्हा एकदा कटुता निर्माण झाली. तुर्कीला धडा शिकवण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला. याचबरोबर या दोन्ही देशात जाणाऱ्या ६० टक्के भारतीय पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केली. त्यानंतर बीसीएएसने तुर्कीला आणखी एक धक्का दिला. बीसीएएसने तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली.
Bureau of Civil Aviation Security revokes security clearance for Celebi Airport Services India Pvt Ltd with immediate effect in the "interest of national security" pic.twitter.com/A4YGBtUQcc
— ANI (@ANI) May 15, 2025
दरम्यान, २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला ग्राउंड हँडलिंगसाठी दिलेली सुरक्षा मंजुरी आता राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी तात्काळ रद्द करण्यात येत आहे, असे विमान वाहतूक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे.
तुर्की कंपनी सेलेबी भारतातील ९ प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवायची. ही कंपनी मुंबई,कोची, टान्सजेंडर, बंगळुरू, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, चेन्नई या प्रमुख विमानतळांवर बॅगेज हँडलिंग, रॅम्प सर्व्हिस आणि कार्गो हँडलिंग सारख्या सेवा पुरवत होती. मात्र, यापुढे सेलेबी भारतातील कोणत्याही विमानतळावर सेवा देऊ शकणार नाही. देशाच्या सुरक्षेचा विचार करून हे पाऊल उचलण्यात आल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले.