पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:51 IST2025-05-15T13:50:42+5:302025-05-15T13:51:29+5:30

सोशल मीडियावर सध्या भारतीयांकडून #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan सारखे हॅशटॅग वापरून दोन्ही देशांवर बहिष्कार टाकला आहे.

India-Pakistan War: Indian tourists boycott Turkey and Azerbaijan for supporting Pakistan | पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला

पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला

भारत-पाकिस्तान तणावात उघडपणे पाकड्यांची बाजू घेणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला भारतीयांना इंगा दाखवला आहे. या दोन्ही देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला त्यामुळे संतापलेल्या भारतीयांनी तुर्की आणि अझरबैजानला बॉयकॉट करणं सुरू केले आहे. भारतीय टूर अँन्ड ट्रॅव्हल कंपन्यांनीही तुर्की आणि अझरबैजानला ताकद दाखवली आहे. देशातील प्रमुख ट्रॅव्हल कंपन्यांनी या दोन्ही देशांचे पर्यटक टूर पॅकेज विकणे बंद केले आहे. त्यासाठी दोन्ही देशातील पर्यटनाचा प्रचार-प्रसार थांबवला आहे.

सोशल मीडियावर सध्या भारतीयांकडून #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan सारखे हॅशटॅग वापरून दोन्ही देशांवर बहिष्कार टाकला आहे. भारतीयांनी उघडपणे दोन्ही देशाविरोधात संताप व्यक्त केला आहे. याबाबत केसरी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्सचे एमडी शैलेश पाटील म्हणाले की, पहलगाम हल्ला हा मानवतेविरोधात होता. भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. तुर्कीने पाकिस्तानची साथ देणे चुकीचे होते. त्यामुळे केसरी टूरकडून तुर्किस्तानवर बंदी घालण्यात आली आहे. यापुढे आमचे पर्यटक तुर्कीला नेणार नाही. तुर्कीसाठी सर्व बुकींग बंद करण्यात आलेत. युरोपात जाण्यासाठी तुर्की एअरलाईन्सचा वापरही करणार नाही. आमचे शेकडो पर्यटक आहेत परंतु तुर्कीचा प्रत्येक बाजूने बहिष्कार करायला हवा असं त्यांनी सांगितले.

तर जेव्हा मालदीवने भारतविरोधी भूमिका घेतली तेव्हा सर्वात आधी मेक माय ट्रिपने राष्ट्रहितासाठी मालदीवचे हॉटेल, फ्लाईट सेवा रद्द करून ग्राहकांना त्यांचे पैसे परत दिले होते. तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानातील दहशतवादाला पाठिंबा दिला. त्यामुळे आम्ही मार्गदर्शक सूचना काढली आहे. यापुढे आवश्यकता नसेल तिथे जाऊ नका. भारतातून जवळपास २ ते अडीच लाख पर्यटक तुर्की आणि अझरबैजानला जातात. आता भारतीय पर्यटकांनी या दोन्ही देशांवर बहिष्कार टाकल्याने दोघांना ३ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागेल. परदेश प्रवासासाठी भारतीयांनी ग्रीस, आर्मेनिया, थायलँडसारख्या देशांचा पर्याय निवडावा असं मेक माय ट्रीपचे फाऊंडर प्रशांत पित्ती यांनी आवाहन केले आहे.

हॉलिडे इंडिया कंपनीकडूनही बॉयकॉट

दरम्यान, प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनी हॉलिडे इंडिया यांनीही तुर्की आणि अझरबैजानचा बहिष्कार केला आहे. आमच्या व्यवसायाआधी देश महत्त्वाचा आहे. जेव्हा एखादा देश भारताविरोधात उभा राहतो, शत्रूला साथ देतो तेव्हा आमचे पर्यटक त्या देशात पाठवणे योग्य नाही. भारताविरोधात भूमिका घेणाऱ्या देशांना भारतीय पर्यटकांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची किंमत चुकवावी लागेल असं हॉलिडे इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राकेश जैन यांनी म्हटलं.

पर्यटनावर परिणाम

तुर्की आणि अझरबैजान ही दोन्ही ठिकाणे भारतीय पर्यटकांसाठी लोकप्रिय आहेत, विशेषतः तुर्की दरवर्षी हजारो भारतीय पर्यटकांना त्यांच्या ऐतिहासिक वारसामुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे आकर्षित करते. पण आता या बहिष्काराचा परिणाम या देशांच्या पर्यटन उद्योगावर होऊ शकतो. जर हा ट्रेंड दीर्घकाळ चालू राहिला तर या देशांना पर्यटन क्षेत्रात मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याच वेळी, भारतीय पर्यटक आता दुबई, श्रीलंका आणि युरोप सारख्या इतर पर्यायांकडे वळू शकतात.

Web Title: India-Pakistan War: Indian tourists boycott Turkey and Azerbaijan for supporting Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.