२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:54 IST2025-05-13T10:53:57+5:302025-05-13T10:54:27+5:30
२८ एप्रिलला भारतीय जवान देबराज यांच्या पत्नी लिपी यांनी निरोगी मुलीला जन्म दिला. त्यावेळी पती देबराज पत्नीसोबत होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.

२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्ले चढवले जात होते. त्यामुळे भारतीय जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. अनेक जवान सुट्टीवरून थेट सीमेवर देशाच्या रक्षणासाठी पोहचले. परंतु आता युद्धविराम झालं आहे. सीमेवरही शांतता प्रस्थापित होत आहे. मात्र ओडिशाच्या संबलपूर इथं हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका जवानाच्या पत्नीचं उपचारावेळी निधन झाले आहे. देबराज असं या जवानाचं नाव असून तो सशस्त्र सीमा दलात कार्यरत आहे. आजारी पत्नी आणि नवजात मुलीचा निरोप घेत देबराज सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात झाला आहे.
२८ एप्रिलला भारतीय जवान देबराज यांच्या पत्नी लिपी यांनी निरोगी मुलीला जन्म दिला. त्यावेळी पती देबराज पत्नीसोबत होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. घरात चिमुकलीचं आगमन झाले होते. परंतु हा आनंद काही क्षणापुरता टिकला. मुलीच्या जन्मानंतर काही तासांतच तिच्या आईची तब्येत खालावत गेली. लिपीची प्रकृती पाहता तिला डॉक्टरांनी बुर्ला मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे नेले. ती आयसीयूत उपचार घेत होती. लीपी बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते.
देबराजला ड्युटीवर बोलावले...
पत्नी आजारी, नवजात लेक या संकटाच्या काळात भारतीय जवान देबराज पत्नीच्या प्रकृतीने चिंतेत होता. २ दिवसांपूर्वी सशस्त्र सीमा दलाने जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तात्काळ सीमेवर पुन्हा परतण्याचे आदेश दिले. देशसेवेला प्राधान्य देत देबराज यांनी आजारी पत्नी आणि नवजात लेकीचा निरोप घेतला. त्यानंतर १३ मे रोजी देबराज यांच्या आजारी पत्नीने उपचारावेळी अखेरचा श्वास घेतला. मर्ल्टी ऑर्गन फेल्युर यामुळे देबराज यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नुकत्याच जन्मलेल्या लेकीने तिच्या आईचा चेहराही नीट पाहिला नाही आणि दुसरीकडे वडील देबराज देशाच्या रक्षणासाठी सीमेवर गेलेत. लिपीच्या निधनानं आणि नवजात लेकीच्या चेहऱ्याकडे पाहून गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले आहेत. वडील सीमेवर आणि आई गेल्याने नवजात लेक आता एकटीच पडली आहे.