'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 08:45 IST2025-05-20T08:42:49+5:302025-05-20T08:45:55+5:30
जर फोटो लावायचा होता तर सैन्याच्या प्रमुखांचा किंवा कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा लावायचा होता असं सांगत आम आदमी पक्षाने मोदींच्या फोटोवर आक्षेप घेतला आहे.

'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेनेऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सन्मान देण्यासाठी ट्रेनच्या तिकिटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलामी देतानाचा फोटो छापला आहे. हा फोटो वीर सैनिकांचे शौर्य आणि त्यांच्या बलिदानाला श्रद्धांजली म्हणून छापला असल्याचं रेल्वेने सांगितले.
रेल्वे बोर्डाचे सूचना आणि प्रचार संचालक दिलीप कुमार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या हिरोंना सलाम केला आहे आणि त्यांच्या वीरतेचा सन्मान केला आहे. या उद्देशाने ट्रेनच्या तिकिटावर पंतप्रधानांचा फोटो आणि संदेश छापण्यात आला आहे. त्याशिवाय रेल्वेच्या विविध झोन आणि मंडलेही हे अभियान व्यापकपणे साजरा करतील. अनेक प्रमुख रेल्वे स्टेशन तिरंग्याने सजवले जातील. शाळकरी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ज्याचा विषय ऑपरेशन सिंदूर ठेवला आहे.
अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला फोटो
जम्मू, पठाणकोट, नवी दिल्ली, श्रीनगरसारख्या स्टेशनवर बेंच आणि अन्य सुविधा सैन्याच्या गणवेशातील रंगात रंगवले जातील. पठाणकोट स्टेशनला सिंदूरच्या रंगाने सजवले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचा फोटो पोस्ट केला असून त्यावर 'रंग ये सिंदूर का' असं कॅप्शन लिहिलं आहे.
त्याशिवाय नवी दिल्ली स्टेशनवर काही बेंच सैनिकांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. ज्यावर सैनिक सन्मान असा उल्लेख आहे. प्रतिक्षालयात काही जागा सैन्यासाठी समर्पित करण्यात आल्या आहेत अशी माहिती उत्तर रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख हिमांशु उपाध्याय यांनी सांगितले. जम्मू, सांबा, मुकेरिया, गुरदासपूर, पठाणकोट, कठुआसारख्या प्रमुख स्टेशनचे बेंचही सैन्य गणवेशात रंगवण्यात आले आहेत. स्टेशनच्या सजावटीसोबतच स्काऊट्स, गाईड्स, सिविल डिफेन्स वॉलियंटर्स यांच्यासह तिरंगा यात्रा काढण्यात आली. सार्वजनिक डिस्प्लेवर देशभक्ती गीत आणि सैनिकांच्या शौर्याचे व्हिडिओही प्रसारित करण्यात येत आहेत.
तिकिटावरील मोदींच्या फोटोवर 'आप'चा आक्षेप
दरम्यान, भारतीय सैन्य आणि ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली महामानव स्वत:चा प्रचार करतायेत. भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांना कठोर धडा शिकवला. या काळात संपूर्ण देश सैन्यासोबत उभा राहिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यातही त्यांचा प्रचार करत आहेत. जर फोटो लावायचा होता तर सैन्याच्या प्रमुखांचा किंवा कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा लावायचा होता असं सांगत आम आदमी पक्षाने मोदींच्या फोटोवर आक्षेप घेतला आहे.
सेना और ऑपरेशन सिंदूर के नाम पर अपना प्रचार कर रहे महामानव‼️
भारतीय सशस्त्र बलों ने ऑपरेशन सिंदूर चलाकर पाकिस्तानी आतंकवादियों को कड़ा सबक सिखाया। इस दौरान पूरा देश अपनी सेनाओं के साथ खड़ा रहा।
अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इसमें भी अपने प्रचार और छपास का मौका ढूंढ़ लिया है।… pic.twitter.com/eddqC8Yx1q— AAP (@AamAadmiParty) May 19, 2025