नवी दिल्ली - सीमेपलीकडील दहशतवादाविरोधातभारताची जागतिक स्तरावर लढाई सुरू झाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचीदहशतवादविरुद्ध लढाई मजबूत करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. भारताने राजनैतिक दृष्टीकोनातून सर्वपक्षीय ७ जणांचे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
या शिष्टमंडळाचा हेतू स्पष्ट आहे की, दहशतवादाबाबत भारताची झीरो टॉलरेंस धोरण जगापर्यंत पोहचवणे. विशेषत: या अभियानात सर्व प्रमुख पक्षातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. ज्यातून दहशतवादाविरोधात भारत एकजूट आहे असं संकेत दिले जात आहेत. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, सर्वात महत्त्वाच्या क्षणी भारत एकजूट उभा राहतो. ७ सदस्यीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख देशांचा दौरा करेल. तिथे दहशतवादाविरोधात भारताच्या धोरण स्पष्ट करेल. राजकारण आणि मतभेद यापेक्षा राष्ट्रीय एकता शक्तीशाली प्रतिक असल्याचं त्यांनी सांगितले.
शिष्टमंडळात कोणाचा समावेश?
भारताचे हे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देश आणि इतर प्रमुख देशांचा या महिन्याच्या अखेरीस दौरा करेल. या शिष्टमंडळात काँग्रेसचे शशी थरूर, भाजपाचे रविशंकर प्रसाद, जनता दलाचे संजय कुमार झा, भाजपाचे बैजयंत पांडा, डीएमकेचे कनीमोई करुणानिधी, शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे, शिंदेसेनेकडून श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.
माहितीनुसार, हे शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार आणि संयुक्त अरब अमीरातसारख्या देशांचा दौरा करतील. हा परदेश दौरा २२ मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. भारत सरकारचा हा प्रयत्न जागतिक पातळीवर पाकिस्तानकडून पोसला जाणारा दहशतवाद आणि भारताच्या नागरी वस्त्यांवरील हल्ले याची माहिती प्रमुख देशांना देणार आहे.
दरम्यान, भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात माझा समावेश होणे याचा मला गर्व आहे. मी ही जबाबदारी विनम्रपणे स्वीकारते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि परराष्ट्र विभागाचे आभार मानते अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.