India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:20 IST2025-05-08T16:19:18+5:302025-05-08T16:20:57+5:30
India pakistan tensions rise: पाकिस्तानने भारतातील काही लष्करी तळावरच मिसाईल आणि ड्रोन्स हल्ले केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या दोन राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानातील ९ ठिकाणं उद्ध्वस्त केली. भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या जबरदस्त प्रहाराने मात्र पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. २२ एप्रिलपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या मिसाईल्स भारतीय लष्कराने हाणून पाडल्या. त्यानंतर आता पंजाब आणि राजस्थानमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला असून, पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारताच्या दहशतवाद्यांवरील कारवाईने पाकिस्तानच बिथरला असून, सीमेपलिकडून अंदाधूंद गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानी लष्कराकडून सीमेलगत असलेल्या भारतीय गावांवर उखळी तोफा आणि तोफेगोळे डागले जात आहेत. त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पंजाब आणि राजस्थान सीमेवर अलर्ट
पंजाबची ५३२ किमी सीमा पाकिस्तानला लागून आहेत, तर राजस्थानची तब्बल १०७० सीमा आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात आहे.
वाचा >>पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंजाबमधील पोलीस विभागाने सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर वाढता तणाव लक्षात घेऊन सरकारने सीमावर्ती भागात असलेल्या सहा जिल्ह्यातील म्हणजे फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, अमृतसर, गुरूदासपूर आणि तरनतारन या जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या जिल्ह्यांतील शाळा पुढील आदेश देईपर्यंत बंद राहणार आहेत.
राजस्थानातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
सूत्रांनी सांगितले की, पंजाबरोबरच राजस्थान सरकारनेही सीमावर्ती भागातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून राजस्थानातील श्रीगंगानगर, बिकानेर, जैसलमेर, बाडमेर या जिल्ह्यांमधील सर्व शासकीय आणि खासगी शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. या चार जिल्ह्यातील प्रशासनाला सर्व आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.