तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:29 IST2025-05-09T18:26:42+5:302025-05-09T18:29:52+5:30
India Pakistan Conflict: भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणी ३०० ते ४०० ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र यातील बहुतांश ड्रोन नष्ट करण्यात यश आल्याची माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली आहे. तसेच हे सर्व ड्रोन तुर्कीमध्ये तयार झालेले होते, असेही त्यांनी सांगितले.

तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती
पहलागामधील हल्ला आणि भारतानेऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला दिलेलं प्रत्युत्तर यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाकिस्तानकडून होणाऱ्या आगळीकीला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणी ३०० ते ४०० ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. मात्र यातील बहुतांश ड्रोन नष्ट करण्यात यश आल्याची माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली आहे. तसेच हे सर्व ड्रोन तुर्कीमध्ये तयार झालेले होते, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यांबाबत माहिती देताना सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारतामधील ३६ ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासामध्ये या हल्ल्यासाठी तुर्कीमध्ये तयार झालेल्या ड्रोनचा वापर केला गेला असल्याचे समोर आले आहे. भारतीय हवाई दलाने याला तत्काळ प्रत्युत्तर देत ड्रोनच्या माध्यमातून जोरदार प्रतिहल्ला केला. यामध्ये पाकिस्तानची सर्व्हिलान्स रडार प्रणाली पूर्णपणे नष्ट झाली, भारताने केलेल्या या कारवाईमध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्करी अभियानासाठी हा एक मोठा धक्का आहे, असेही त्यांनी सांगितले.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली नव्हती. उलट तिचा ढालीसारखा वापर केला. त्यावेळी कराची आणि लाहोरसारख्या शहरांवरून प्रवासी विमाने जात होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आले होते. मात्र सर्वसामान्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ नये यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी ही संपूर्ण कारवाई संयमीपणे हाताळली. आता या संयमी भूमिकेचं आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही कौतुक होत आहे.
त्याबरोबरच पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरही मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. घुसखोरीचेही प्रयत्न झाले, तंगधार, उरी आणि उधमपूरमध्य मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात काही प्रमाणात नुकसान झालं आहे. यादरम्यान, भारताच्या हवाई दलानेही बऱ्यापैकी संयम बाळगला, असेही त्यांनी सांगितले.