जम्मू - भारत-पाकिस्तान युद्धविराम घोषणेनंतर ४८ तासांत दक्षिण काश्मीरातील शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. यात लश्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. १३ मे रोजी शोपियानातील केलर इथल्या जंगलात सुरक्षा दलाने ही कारवाई केली होती.
सीमेवरील गोळीबार बंद होताच सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांना ठेचण्याचं काम सुरू केले आहे. त्यात मंगळवारी सकाळी शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्यात चकमक झाली. यात लश्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहीद कुट्टे आणि अदनान शफीसह ३ दहशतवादी मारले गेले. यातील तिसरा दहशतवादी अहसान-उल-हक शेख हा पुलवामातील रहिवासी आहे. या दहशतवाद्यांकडून दारुगोळा, हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यात एके ४७, मॅगजीन, ग्रेनेड आणि अन्य शस्त्रांचा समावेश आहे.
याबाबत जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी शोपियान जिल्ह्यातील केलर परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांकडून स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सैन्याचे २० राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ जवान तिथे दाखल झाले. परिसरात सर्च ऑपरेशन घेण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी वेढा घातलाय समजताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा जवानांनीही चोख उत्तर दिले. या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचे ३ दहशतवादी मारले गेले.
लश्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि ए श्रेणीतला दहशतवादी होता कुट्टे
दक्षिण काश्मीरातील शोपियान जिल्ह्यात मारला गेलेला दहशतवादी शाहीद कुट्टे शोपियातील चोटीपोरा इथला रहिवासी आहे. मार्च २०२३ साली तो लश्कर ए तोयबात सहभागी झाला होता. तो लश्कराचा प्रमुख दहशतवादी होता. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता. ८ एप्रिल २०२४ साली दानिश रिसोर्टवर झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता. या दहशतवादी हल्ल्यात जर्मनीचे २ पर्यटक आणि १ वाहनचालक जखमी झाला होता. १८ मे २०२४ साली हिरपोरामध्ये भाजपा सरपंचाची हत्या करण्यात त्याचा कट होता. त्यानंतर ३ फेब्रुवारीला कुलगाम येथे आर्मी जवानाच्या हत्येची सुई त्याच्याकडे जात होती.