कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 21:59 IST2025-11-25T21:58:38+5:302025-11-25T21:59:36+5:30
गुजरातच्या कच्छमध्ये दोन महिन्यातील दुसरी घटना.

कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
India-Pakistan Border: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून सोमवारी एक विचित्र घटना समोर आली. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मित्ती गावातील एक हिंदू प्रेमी युगुल कुटुंबियांच्या विरोधामुळे घर सोडून चक्क भारतात पळून आले. मात्र, आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताच दोघांनाही सीमा सुरक्षा दलाने (BSF) ताब्यात घेतले.
कुटुंबीयांच्या विरोधामुळे घेतला धोकादायक निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय पोपट आणि 20 वर्षीय गौरी या दोघांचे पाकिस्तानातील मित्ती गावात वास्तव्य आहे. दोघांचे प्रेमसंबंध कुटुंबियांना मान्य नसल्याने त्यांनी मोठा धोका पत्करुन भारतात येण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्री घरातून निघालेल्या या युगलाने सुमारे 8 किलोमीटरचा पायी प्रवास करत भारताच्या सीमेत प्रवेश केला.
BSF ने घेतले ताब्यात
पिलर क्रमांक 1016 जवळ गस्त घालत असताना BSFच्या जवानांनी दोघांना संशयास्पद स्थितीत पाहिले आणि त्वरित ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना बालासर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. दोघांनी प्राथमिक चौकशीत सांगितले की, ते एकमेकांवर प्रेम करतात आणि लग्न करू इच्छितात, परंतु कुटुंबीय विरोध करत असल्याने त्यांनी सीमा ओलांडून भारतात येण्याचा निर्णय घेतला.
संयुक्त चौकशीत सखोल तपास
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा संवेदनशील आणि सुरक्षेशी निगडित विषय असल्याने तपास सर्व बाजूंनी केला जाणार आहे. या युगलाला पुढील चौकशीसाठी संयुक्त इंटरोगेशन सेंटर, भुज येथे पाठवले जाणार आहे. त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया आणि FIR नोंदवली जाईल.
दोन महिन्यांत दुसरी घटना
कच्छ सीमेत पाकिस्तानातून अशा प्रकारे पळून येण्याची ही दोन महिन्यांत दुसरी घटना आहे. यापूर्वी 8 ऑक्टोबर रोजीही पाकिस्तानातून आलेले दोन व्यक्ती येथे पकडले गेले होते. सतत घडत असलेल्या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, सीमावर्ती परिसरात देखरेख वाढवण्यात आली आहे.