डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 06:10 IST2026-01-09T06:08:57+5:302026-01-09T06:10:21+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतविरोधी भूमिका अधोरेखित करणाऱ्या कृती करण्याचा धडाका लावला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतविरोधी भूमिका अधोरेखित करणाऱ्या कृती करण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी भारत मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून (आयएसए) अमेरिकेला बाहेर काढले आहे. त्याचबरोबर रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दंडात्मक शुल्क लावण्याचा इशारा देणाऱ्या कायद्याला पाठिंबा दिला आहे. या त्यांच्या दोन्ही कृतींमुळे भारताला थेट लक्ष्य करण्यात आले आहे.
आयएसएमधून अमेरिकेचा बाहेर पडण्याचा निर्णय या महिन्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या आदेशानंतर घेण्यात आला आहे. सौरउर्जेला प्रोत्साहन देणारी व भारतात मुख्यालय असलेली आयएसए ही प्रमुख बहुपक्षीय संस्था या व्यापक आढाव्याची एक बळी ठरली.
भारताला पुन्हा धमकी; ५००% टॅरिफ लावू
रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा प्रस्ताव असलेल्या एका वादग्रस्त विधेयकालाही ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. सवलतीच्या दरातील रशियन कच्च्या तेलाच्या सर्वांत मोठ्या आयातदारांपैकी एक असलेल्या भारतालाच यामागील प्राथमिक लक्ष्य मानले जात आहे.
विश्वासाच्या जागी व्यावहारिक दबाव
या कृती ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिका-भारत संबंधांमध्ये असलेल्या धोरणात्मक सौहार्दापासून बदलाचे संकेत देतात. भागीदारीऐवजी, भारताकडे समस्या म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकन व्यवस्थेचा गैरफायदा घेणे, पाश्चात्य निर्बंधांचे उल्लंघन करणे आणि ट्रम्प ज्या बहुपक्षीय मंचांचा तिरस्कार करतात, त्यांचा फायदा घेतल्याचे आरोप आता केले जात आहेत. भारतासाठी संदेश स्पष्ट आहे - ट्रम्प २.०च्या राजवटीत, धोरणात्मक विश्वासाची जागा व्यावहारिक दबावाने घेतली आहे.
काम थांबणार नाही : भारत
ट्रम्प यांनी 'आंतरराष्ट्रीय सौर युती' या भारताच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा सौर युतीच्या ध्येयावर कोणताही परिणाम होणार नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. १२५ सदस्य देशांच्या मदतीने सौर ऊर्जेच्या माध्यमातून हवामान बदलाचे लक्ष्य गाठण्यासाठी भारत प्रवास सुरूच ठेवणार आहे.
सौर युती कशासाठी?
स्थापना : २०१५ (पॅरिस हवामान परिषद - सीओपी २१)
पुढाकार : भारत आणि फ्रान्स यांचा संयुक्त उपक्रम.
मुख्यालय : गुरुग्राम (भारत).
उद्देश : सौर ऊर्जेचा वापर वाढवून हवामान बदलाचा सामना करणे.
विस्तार : सध्या १२५ सदस्य देश सहभागी.