चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:35 IST2025-08-08T08:33:53+5:302025-08-08T08:35:24+5:30
Brahmaputra river latest news : ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे काळजीपूर्वक लक्ष आहे. यात चीनच्या जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याच्या योजनांचाही समावेश आहे. याबरोबरच भारत सरकार आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत आहे.

चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : व्यापाराच्या मुद्द्यावर अमेरिकेशी तणाव वाढलेला असतानाच भारत सरकार चीनशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांबाबत अत्यंत सावध आहे. अरुणाचल प्रदेशजवळ ब्रह्मपुत्रा नदीवरचीनने एका मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे का, असा प्रश्न संसदेत गुरुवारी विचारण्यात आला होता, तेव्हा वरील बाब पुढे आली. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की, तिबेटमधील यारलुंग त्सांगपो नदीच्या खालच्या भागात (म्हणजेच ब्रह्मपुत्राच्या वरच्या भागात) चीनने एक महाकाय धरण प्रकल्प बांधण्यास सुरुवात केल्याच्या वृत्तांची सरकारने दखल घेतली आहे.
ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे काळजीपूर्वक लक्ष आहे. यात चीनच्या जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याच्या योजनांचाही समावेश आहे. याबरोबरच भारत सरकार आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत आहे.
चीनला सांगितली चिंता
सीमापार नद्यांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी २००६ मध्ये स्थापन झालेल्या यंत्रणेमार्फत तसेच राजनैतिक मार्गांद्वारे चीनशी चर्चा केली जाते. मंत्री म्हणाले की, सीमापार नद्यांच्या पाणीहक्काबाबत भारताने चीनच्या अधिकाऱ्यांना सातत्याने आपले विचार आणि चिंता कानावर घातल्या आहेत. यात पारदर्शकता आणि संबंधित देशाशी सल्ला-मसलत करण्याची गरजही व्यक्त केलेली आहे. त्यांच्या कोणत्याही प्रकल्पांमुळे किंवा उपक्रमांमुळे नदीचे पाणी मिळणाऱ्या देशांच्या हिताला हानी पोहोचणार नाही, याची खात्री करण्याचेही आवाहन केलेले आहे.