India Israel: चला, हातात हात घालून नवे मैत्रीपर्व सुरू करू! भारत- इस्रायलची दोस्ती कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:38 IST2025-11-21T14:37:08+5:302025-11-21T14:38:44+5:30
India Israel News: तेल अवीव कोरोनानंतर भारताची अर्थव्यवस्था संपुष्टात येईल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्येक संकटाप्रमाणे याही संकटातून भारताने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली.

India Israel: चला, हातात हात घालून नवे मैत्रीपर्व सुरू करू! भारत- इस्रायलची दोस्ती कायम
अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल अवीव कोरोनानंतर भारताची अर्थव्यवस्था संपुष्टात येईल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्येक संकटाप्रमाणे याही संकटातून भारताने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली. यावर्षी पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.८ टक्के आहे. ३१ मार्च २०२६ला तो ७टक्क्यांवर जाईल, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी येथे केली. भारत-इस्रायल व्यापार शिखर परिषदेचे शानदार उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योगमंत्री नीर बरकत यांच्या निमंत्रणावरून केंद्रीयमंत्री गोयल इस्रायल दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की), असोचेम आणि स्टार्ट-अप इंडिया यांतील सदस्यांचे व्यावसायिक शिष्टमंडळ आहे. ज्या-ज्या वेळी भारतावर संकटे आली त्या-त्या वेळी संकटाचे संधीत रूपांतर करून भारताने गरुडझेप घेतली आहे. इस्रायलदेखील वेगवेगळ्या संकटांना तोंड देत पुढे आला. आपण हातात हात घालून वेगवेगळ्या संधी निर्माण करू या, असे भावनिक आवाहन पीयूष गोयल यांनी केले. पीयूष गोयल आणि नीर बरकत यांनी एकमेकांचे हात हातात घेत दोन देशांच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे जाहीर केले. शेजारी भारताचे इस्रायलमधील राजदूत जे. पी. सिंग.
इस्रायलला भेट देणारे गोयल पहिले वाणिज्यमंत्री
इस्रायलला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत आणि केंद्रीय वाणिज्यमंत्री या नात्याने एवढ्या वर्षात या देशाला भेट देणारा मी पहिला मंत्री आहे, असा उल्लेख पीयूष गोयल यांनी केला. तेव्हा, माझ्या देशात मी आपले प्रथमच वाणिज्यमंत्री या नात्याने स्वागत करतो; पण हे यापुढे अनेकदा होईल, असा आशावाद बरकत यांनी व्यक्त केला. याआधी भारतात इस्रायलचे कृषी, पर्यटन आणि वाणिज्यमंत्री येऊन गेले. पंतप्रधान नेत्यानाहूदेखील भारतात येणार आहेत. दोन्ही देश एकमेकांचे स्पर्धक नाही तर एकमेकांना पूरक आहेत. गुंतवणुकीसाठी भारत सुरक्षित सेक्युलर प्रदेश आहे.- जे. पी. सिंग, भारताचे इस्रायलमधील राजदूत
भारतीय मुलगी माझी सून : मंत्री नीर बरकत
मी इस्रायलमध्ये केवळ वाणिज्यमंत्री नाही तर माझ्या घरात भारतीय मुलगी सून म्हणून आली आहे. त्यामुळे भारताचे माझे नाते केवळ व्यावसायिक नाही तर कौटुंबिकही आहे, असा आवर्जून उल्लेख इस्रायलचे वाणिज्यमंत्री नीर बरकत यांनी केला. भारतात प्रचंड स्कोप आहे आणि आम्हाला भारताचा भागीदार व्हायला नेहमीच आवडेल. दोन्ही देशांची मैत्री यापुढेही कायम राहील, असे त्यांनी बरकत यांनी सांगितले.
अनेक उद्योजक, सीईओ दौऱ्यात उपस्थित
या इस्रायल दौऱ्यात फिक्की व्यावसायिक प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख जलज दानी, सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष जयेन मेहता, 'सीआयआय'चे अध्यक्ष राजीव मेमनाई, मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ इस्रायलचे अध्यक्ष रॉन टोमर, इस्रायल आशिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अनाथ बर्न स्टाईन, जेम्स अँड ज्वेलर्सचे अध्यक्ष किरीट भन्साळी, इस्रायल नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिलचे प्रमुख प्रा. अवी सिम्होन, इन्व्हेस्ट इंडियाचे उपाध्यक्ष गौरव श्लोकिया, एअरटेक सोलरचे सीईओ टोल गॅबे यांच्यासह देशभरातील अनेक उद्योजक, सीईओ यावेळी उपस्थित होते.