भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:45 IST2026-01-12T15:44:57+5:302026-01-12T15:45:33+5:30
India-Germany Relations : या पाणबुड्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) तंत्रज्ञान.

भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार
जर्मनी 'प्रोजेक्ट ७५ (I)' अंतर्गत भारताला 6 अत्याधुनिक स्टील्थ पारंपरिक पाणबुड्या तयार करण्यासाठी मदत करणार आहे. यासंदर्भात मुंबईतील मझगाव डॉकयार्ड लिमिटेड (MDL) आणि जर्मनीची प्रसिद्ध संरक्षण कंपनी 'थिसेन क्रुप मरीन सिस्टम्स' (TKMS) यांच्यात एक महत्त्वाचा करारही झाला आहे. हा प्रोजेक्ट तब्बल ७२ हजार कोटी रुपयांचा असून भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पाणबुडी प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. या पाणबुड्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) तंत्रज्ञान.
महत्वाचे म्हणजे, या AIP तंत्रज्ञानामुळे हा प्रकल्प बराच काळ रेंगाळला होता. कारण भारतीय नौदलाला अशा पद्धतीच्या पाणबुड्या हव्या होत्या, ज्या अधिक 'स्टील्थ' (गुप्त) असतील आणि कमी आवाज करतील. तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर आता, यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या सर्व ६ पणबुड्यांची निर्मिती भारतात मझगाव डॉकयार्डमध्ये होईल. यामुळे 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेलाही प्रोत्साहन मिळेल. जर्मनीचे तंत्रज्ञान आणि भारताची क्षमता यांच्या संगमामुळे हिंदी महासागर क्षेत्रात भारताची धोरणात्मक पकड अधिक मजबूत होईल.
असं आहे AIP तंत्रज्ञान -
AIP तंत्रज्ञान अर्थात एयर इंडिपेंडेंट प्रोपल्शन. हे तंत्रज्ञान अ-परमाणु पाणबुड्यांना हवेविना दीर्घकाळ पाण्याखाली राहण्यासाठी सक्षम बनवते. सामान्य डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांना बॅटरी चार्ज करण्यासाठी वारंवार समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागते, यामुळे त्या शत्रूच्या नजरेत येण्याचा धोका असतो. AIP तंत्रज्ञान हा धोका कमी करते. कमी आवाज आणि पाण्याखाली दीर्घकाळ राहण्याच्या क्षमतेमुळे या पाणबुड्यांना ट्रॅक करणे शत्रूला कठीण जाते.
या पाणबुड्या केवळ गुप्त राहण्यासाठीच नव्हे, तर यांत लावण्यात आलेल्या पारंपरिक शस्रास्त्रे यांना अधिक घातक बनवतात. AIP पाणबुडीतील मुख्य शस्त्र, टॉरपीडो आहे. यात ५३३ मिमी कॅलिबरचे जड टॉरपीडो, अँटी-शिप मिसाईल्स, जमिनीवर हल्ला करणारी क्रूझ मिसाईल्स आणि सागरी माईन्सचा समावेश असेल, ज्यामुळे या पाणबुड्या युद्धक्षेत्रात अत्यंत घातक ठरतील.