खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 23:21 IST2025-11-25T23:19:45+5:302025-11-25T23:21:06+5:30
चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा दावा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
India-China : चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचीनचा भाग असल्याचे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेशातील पेमा वांगजॉम नावाच्या महिलेला चीनी अधिकाऱ्यांनी थांबवल्याप्रकरणी भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय, चीनने अरुणाचल प्रदेशाबाबत केलेल्या दाव्यालाही जोरदार प्रत्युत्तरही दिले.
नेमके काय झाले?
पेमा वांगजॉम वैध भारतीय पासपोर्टवर लंडनहून जपानला जात होत्या. चीनच्या शांघायमध्ये त्यांचा 3 तासांचा हॉल्ट होता. यादरम्यान, चीनी अधिकाऱ्यांनी त्यांचा पासपोर्ट ‘इनव्हॅलिड’ असल्याचे सांगत, त्यांना जवळपास 18 तास रोखून ठेवले. हे प्रकरण समोर आल्यानंतर, भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, या प्रकरणावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या की, या महिलेवर कोणतीही बळजबरी, अटक किंवा छळ करण्यात आला नाही. चीनच्या सीमा निरीक्षण अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया कायद्याप्रमाणेच केली आहे. यासोबतच माओ निंग यांनी अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा दावा केला.
Our response to media queries on statements made by the Chinese Foreign Ministry⬇️
— Randhir Jaiswal (@MEAIndia) November 25, 2025
🔗 https://t.co/3JUnXjIBLcpic.twitter.com/DjEdy7TmTK
अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग
चीनच्या या दाव्याला प्रत्युत्तर देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, पेमा यांना अडवणे हे चीनकडून आंतरराष्ट्रीय विमान प्रवास नियमांचे उघड उल्लंघन आहे. याशिवय, त्यांनी स्पष्ट केले की, अरुणाचल प्रदेश भारताचा अभिन्न भाग आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना भारतीय पासपोर्ट धारण करण्याचा पूर्ण वैध अधिकार आहे. चीनचे दावे वास्तव बदलू शकत नाहीत.
चीनकडून नियमभंग?
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निदर्शनास आणले की, चीनच्या स्वतःच्या धोरणानुसार सर्व देशांच्या नागरिकांना 24 तास व्हिसा-फ्री ट्रान्झिटची परवानगी आहे. अशा स्थितीत पेमा यांना रोखणे पूर्णपणे नियमबाह्य होते.
पेमा यांचा आरोप; 18 तास डांबवून ठेवले
पेमा यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले की, त्यांचा 3 तासांचा लेओवर एक भयानक अनुभव ठरला. त्यांना सुमारे 18 तास रोखण्यात आले. या सर्व त्रासाचे कारण, त्यांच्या पासपोर्टवरील जन्मस्थान अरुणाचल प्रदेश होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा संपूर्ण प्रसंग राजकीय कारणांनी प्रेरित होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शांघायमधील भारतीय वाणिज्य दूतावासानेही तत्काळ हस्तक्षेप करुन पेमा वांगजोम थोंगडोक यांची मदत केली व त्यांना रात्री उशिराच्या उड्डाणाने रवाना करण्यात आले.