India China FaceOff: ‘त्या’ जवानांना लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडून शाबासकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:55 IST2020-06-25T03:55:24+5:302020-06-25T06:55:35+5:30
दोन्ही देशांतील तणाव आता निवळू लागला असला तरी तिथे अतुलनीय शौर्य गाजविणा-या भारतीय जवनांचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेटून कौतुक केले. लष्करप्रमुखांनी त्या जवानांना प्रशस्तीपत्रेही दिली.

India China FaceOff: ‘त्या’ जवानांना लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडून शाबासकी
लेह : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी लष्कराबरोबर १५ जूनला झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आता निवळू लागला असला तरी तिथे अतुलनीय शौर्य गाजविणा-या भारतीय जवनांचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेटून कौतुक केले. लष्करप्रमुखांनी त्या जवानांना प्रशस्तीपत्रेही दिली.
लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भागाचा दौरा करून तेथील स्थितीची तसेच भारतीय लष्कराच्या युद्धसज्जतेची बुधवारी पाहणी केली. चीनला लागून असलेल्या सीमाभागातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती नरवणे यांनी नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल योगेशकुमार जोशी यांच्याकडून घेतली.
>१८ जवानांना रुग्णालयात जाऊन भेटले
भारतीय लष्कराच्या जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल त्यांचे लष्करप्रमुख नरवणे यांनी कौतुक केले. भारतीय लष्कराने टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या १८ जवानांवर लेहमधील लष्करी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या जवानांची नरवणे यांनी भेट घेतली. तसेच पूर्व लडाखमधील सीमाभागात तैनात असलेल्या भारतीय जवानांशीही नरवणे यांनी संवाद साधला.