India-China Border: चीनच्या व्हिडीओला भारताचे प्रत्युत्तर; जारी केला तिरंग्यासह 30 सशस्त्र भारतीय सैनिकांचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:13 IST2022-01-04T15:12:55+5:302022-01-04T15:13:05+5:30
काही दिवसांपूर्वीच गलवान घाटीत चीनी सैनिक चीनचा ध्वज फडकावत राष्ट्रगीत गात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

India-China Border: चीनच्या व्हिडीओला भारताचे प्रत्युत्तर; जारी केला तिरंग्यासह 30 सशस्त्र भारतीय सैनिकांचा फोटो
नवी दिल्ली: नववर्षानिमित्त गलवान घाटीत भारतीय सैनिकांनी तिरंगा झेंडा फडकावला आहे. लष्कराने अद्याप या चित्राला दुजोरा दिला नसला तरी याचा फोटो समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने दोन छायाचित्रे जारी केली आहेत. छायाचित्रांमध्ये लष्कराचे 30 जवान तिरंग्यासोबत दिसत आहेत. यावेळी सैनिकांच्या हातात शस्त्रेदेखील दिसत आहेत. एक तिरंगा भारतीय चौकीवर फडकत आहे तर दुसरा तिरंगा सैनिकांच्या हातात आहे.
काही दिवसांपूर्वीच गलवानमध्ये पीएलए सैनिक चीनचा ध्वज फडकावत राष्ट्रगीत गात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर भारत सरकारवर विरोधकांकडून प्रचंड टीका करण्यात आली. पण, आता भारतीय सैन्याकडून याच परिसरात भारतीय झेंडा फडकावल्याचे फोटो समोर आले आहेत. गलवानमध्ये चीनच्या चुकीच्या प्रचाराला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांच्या फोटोंकडे पाहिले जात आहे.
चिनी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी
गलवानमध्ये चीनचा ध्वज फडकावतानाचा व्हिडिओ चीनच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता. कॅप्शनमध्ये लिहीले- 2022 च्या पहिल्या दिवशी, चीनचा ध्वज गलवान व्हॅलीवर फडकत आहे. हा ध्वज खास आहे कारण तो एकदा बीजिंगमधील तियानमेन स्क्वेअरवर फडकला होता.
पण, आता भारतीय लष्कराने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. चिनी व्हिडिओवरून वाद वाढल्यानंतर भारताने सांगितले की, ज्या भागात चीनने गलवान व्हॅलीचा ध्वज उभारला आणि फडकवला, तो भाग नेहमीच त्यांच्याच ताब्यात आहे आणि या क्षेत्राबाबत कोणताही नवीन वाद नाही. भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.