बांगलादेशने दोन महिन्यांतच मागितला ६ महिन्यांचा डिझेल साठा; आधीच इंधन टंचाई, त्यात यांची हाव वाढत चालली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:44 IST2026-03-10T13:42:18+5:302026-03-10T13:44:02+5:30
India Bangladesh Diesel pipeline supply: BPC चेअरमन महमूद रेजानूर रहमान यांचे मोठे विधान. भारत-बांगलादेश डिझेल करारांतर्गत ९०,००० टन डिझेलची तातडीने मागणी. भारताच्या इंधन निर्यातीवर वाढला ताण.

बांगलादेशने दोन महिन्यांतच मागितला ६ महिन्यांचा डिझेल साठा; आधीच इंधन टंचाई, त्यात यांची हाव वाढत चालली...
नवी दिल्ली: इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असतानाच, बांगलादेशने भारताकडे डिझेलची मोठी मागणी केली आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनने भारताकडून येणाऱ्या ६ महिन्यांच्या डिझेलचा कोटा अवघ्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याची मागणी केली असून, यामुळे भारताच्या इंधन नियोजनावर ताण येण्याची शक्यता आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या करारानुसार, भारत दरवर्षी पाइपलाइनद्वारे १,८०,००० टन डिझेलचा पुरवठा करतो. पश्चिम आशियातील तणावामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा धोक्यात आल्याने बांगलादेशला आपल्या देशात इंधनाचा मोठा साठा करायचा आहे. म्हणूनच त्यांनी ६ महिन्यांचे नियोजित ९०,००० टन डिझेल पुढील ६० दिवसांतच मिळावे, अशी मागणी भारताकडे केली आहे.
भारतासमोर पेच
भारताला स्वतःच्या गरजेचा ८५% कच्चा तेल आयात करावा लागतो. इराण संकटामुळे पुरवठा कमी झाला असून किमती १२५ डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचल्या आहेत. चीनने आधीच आपल्या पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात थांबवली आहे. अशा स्थितीत स्वतःची गरज भागवून बांगलादेशला अतिरिक्त डिझेल पुरवणे भारतासाठी एक कठीण आव्हान ठरणार आहे.
बांगलादेश काय म्हणाला...
"पुढील दोन महिन्यांत आम्हाला ६ महिन्यांचा संपूर्ण डिझेल साठा मिळेल," असे विधान बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे चेअरमन महमूद रेजानूर रहमान यांनी केले आहे. या कराराचा भाग म्हणून आज ५,००० टन डिझेलची खेप बांगलादेशला पाठवण्यात आली आहे. नियमानुसार, भारताला ६ महिन्यांत किमान ९०,००० टन डिझेल निर्यात करणे बंधनकारक आहे. मात्र, इराण-इस्रायल युद्धामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, हा ६ महिन्यांचा साठा येत्या दोन महिन्यातच मिळावा, अशी आशा रहमान यांनी व्यक्त केली आहे.