कराची - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतानेऑपरेशन सिंदूर अंतर्गत ६ मे रोजी रात्री पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारतातील सीमा भागातील शहरांवर ड्रोन हल्ले केले, परंतु हे सर्व हल्ले भारताच्या एअर डिफेन्सने यशस्वीपणे परतावून लावले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाक सैन्याच्या तळांवर प्रतिहल्ले केले. त्यात भारताच्या अचूक टार्गेटने पाकिस्तानातील नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाले. या हल्ल्यामुळे ना केवळ पाकिस्तानी सैन्याला हादरा बसला तर त्यामुळे पाकच्या अण्वस्त्राच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले.
भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानची बोबडी वळली. या हल्ल्यानंतर १० मे रोजी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी युद्धविरामची घोषणा केली. परंतु या युद्धविराम करण्यामागे नूर खान एअरबेसचं नुकसान आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्र कमांड सेंटरवरील धोक्याची कहाणी लपली आहे.
भारताची रणनीती, पाकची माघारी
नूर खान एअरबेसला आधी चकला एअरबेस नावाने ओळखलं जात होते. हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून अवघ्या १० किमी अंतरावरील रावलपिंडी येथे आहे. पाकिस्तानी हवाई दलाचे एक प्रमुख लॉजिस्टिक हब इथं आहे. जिथून VVIP हालचाली, टोही मिशन, लांब अंतराच्या मिसाईलचे संचालन केंद्र आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा एअरबेस पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक प्लान्स डिविजन आणि नॅशनल कमांड अथॉरिटीचे मुख्यालयापासून अगदीच जवळ आहे. जे देशातील जवळपास १७० अण्वस्त्राची सुरक्षा आणि संचालनाची जबाबदारी सांभाळते.
१० मे रोजी सकाळी भारताने ब्रह्मोस, हॅमर आणि स्कॅल्प मिसाईलचा वापर करत नूर खान एअरबेसवर अचूक निशाणा साधला. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हा हल्ला इतका भीषण होता की त्याला पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे ट्रॅक करण्यास अयशस्वी ठरले. हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि पाकिस्तानी सैन्यात खळबळ माजली. या हल्ल्यामुळे भारताच्या मिसाईल त्यांच्या संवेदनशील सैन्य ठिकाणांपर्यंत पोहचू शकतात याची जाणीव पाकिस्तानला झाली.
अण्वस्त्रे कमांड सेंटरला धोका
नूर खान एअरबेसपासून काहीच अंतरावर पाकिस्तानी अण्वस्त्रे कमांड सेंटरला या हल्ल्यामुळे धोका निर्माण झाला. या हल्ल्यामुळे भारत पाकिस्तानच्या अण्वस्त्र कमांडला निष्क्रिय करण्याची क्षमता ठेवते हा संदेश पाकिस्तानला मिळाला. भारत अण्वस्त्रांवर हल्ला करून आपली पूर्ण ताकद नष्ट करेल याची भीती पाकिस्तानला वाटली. नूर खान एअरबेसवरील हल्ला त्याचे संकेत देत होता असं एका माजी अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आलाय की, भारताची ब्रह्मोस मिसाईल जर १-२ किमी आणि टार्गेट निशाणा धरला असता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्राच्या साठ्यात मोठा स्फोट घडून रेडिएशनची स्थिती निर्माण झाली असती. मात्र या दाव्याला भारत-पाकिस्तान दोन्ही बाजूने पुष्टी नाही.
...म्हणून पाकला वाचवण्यासाठी अमेरिकेने घेतली मध्यस्थी
नूर खान एअरबेसवरील हल्ल्याची बातमी समजताच अमेरिकेतही खळबळ माजली. भारत-पाकिस्तान यांच्यातील वादात आमचे काही देणे घेणे नाही. ते दोन्ही देश बघून घेतील अशी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने या हल्ल्यानंतर सक्रीयपणे मध्यस्थीची भूमिका निभावली. पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यानंतर तातडीने अमेरिकेशी संपर्क साधला. सैन्य प्रमुख असीम मुनीर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात युद्धविरामच्या दिशेने पहिले पाऊल पडले. त्यानंतर अमेरिकेने भारताशी संपर्क साधला. दोन्ही देशातील संवादानंतर १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामची घोषणा केल्याची माहिती जगाला दिली.