"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:00 IST2025-10-24T17:59:16+5:302025-10-24T18:00:56+5:30
India-America Trade Deal: “रशियाकडून तेल घ्यायचे की नाही, हा आमचा निर्णय.”

"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
India-America Trade Deal: मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतावर सतत व्यापार करारासाठी दबाव टाकत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. “भारत कधीही कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करत नाही,” अशी स्पष्टोक्ती पीयूष गोयल यांनी दिली. ते शुक्रवारी जर्मनीतील बर्लिन डायलॉगमध्ये बोलत होते.
Trade deals are about TRUST pic.twitter.com/KaVu19mpSQ
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 24, 2025
भारत दबावात करार करत नाही
बर्लिनमध्ये झालेल्या या चर्चासत्रात पीयूष गोयल म्हणाले, “भारत सध्या युरोपियन युनियन आणि अमेरिकासारख्या देशांशी आणि आर्थिक गटांशी व्यापार करारांबाबत सक्रिय चर्चा करत आहे. पण आम्ही घाईघाईत किंवा कोणत्याही देशाच्या दडपणाखाली करार करत नाही. प्रत्येक व्यापार करार हा दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिला गेला पाहिजे. भारत कधीही भावनात्मक किंवा राजकीय दबावाखाली निर्णय घेत नाही.”
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
राष्ट्रीय हिताच्या बाहेर निर्णय घेणार नाही
“भारताने कधीही राष्ट्रीय हिताव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणावरून निर्णय घेतलेला नाही. जर कोणी मला सांगितले की, तुम्ही युरोपियन युनियनचे मित्र राहू शकत नाही किंवा केनियासोबत व्यापार करू शकत नाही, तर मी ते स्वीकारणार नाही. भारत अमेरिकेने लावलेल्या उच्च शुल्कांना तोंड देण्यासाठी नव्या आणि उदयोन्मुख बाजारपेठांचा शोध घेत आहे. भारताला जागतिक व्यापारात स्वतःचा प्रभावशाली स्थान निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी "दीर्घकालीन टिकाऊ करार" हाच एकमेव मार्ग आहे," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
India's strong demographic dividend sets it apart. pic.twitter.com/f9g6kLGKr9
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 24, 2025
रशियाकडून तेल खरेदीबाबत थेट प्रतिक्रिया
रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितले की, “एखाद्या देशाकडून कोणतं उत्पादन विकत घ्यायचं, हा निर्णय भारत स्वतः घेतो, कोणत्याही बाह्य दबावावर आधारित नसतो." गोयल यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा ट्रम्प भारतावर रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवण्यासाठी दबाव आणत आहे. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या स्वतंत्र आणि आत्मनिर्भर परराष्ट्र व व्यापार धोरणाची ठळक झलक दाखवते.
भारतीय अर्थव्यवस्था केवळ 4 ट्रिलियन डॉलर नव्हे, तर...
“भारताची अर्थव्यवस्था सध्या सुमारे ४ ट्रिलियन डॉलर आहे, पण परचेसिंग पॉवर पॅरिटी नुसार ती 15 ट्रिलियन डॉलरच्या बरोबरीची आहे. वाढते उत्पन्न, उत्तम जीवनमान आणि नागरिकांच्या अपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेत आहेत," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.