भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 18:04 IST2026-01-11T18:02:39+5:302026-01-11T18:04:31+5:30
India-America Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत पीयूष गोयल महत्वाची माहिती दिली.

भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
India-America Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सुरू असलेल्या चर्चांवर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. 'भारतावर विश्वास ठेवा. इतर कोणत्याही देशांच्या किंवा नेत्यांच्या वक्तव्यांवर लक्ष देण्याची गरज नाही,' असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी केलेल्या दाव्यानंतर गोयल यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. लटनिक यांनी असा दावा केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे भारत-अमेरिका व्यापार करार पूर्ण होऊ शकला नाही.
व्यापार करारांवर चर्चा बंद दरवाज्याआडच
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, गोयल यांनी सांगितले की, 'व्यापार कराराच्या बारीकसारीक मुद्द्यांवर चर्चा ही माध्यमांसमोर नव्हे, तर बंद दरवाज्याआडच केली जाते. अशा संवेदनशील विषयांवर सार्वजनिक दबावाखाली निर्णय घेतले जात नाहीत.'
अमेरिकेचा दावा काय?
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी अलीकडेच दावा केला की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्यापार करारांकडे लक्षा घालून आहेत. जे देश आधी पुढाकार घेतात, त्यांना चांगल्या गोष्टी मिळतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताने वेळेवर पुढाकार न घेतल्यामुळे वॉशिंग्टनने इतर देशांसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
परराष्ट्र मंत्रालयाचा स्पष्ट नकार
या दाव्यांवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका गेल्या एक वर्षाहून अधिक काळपासून सातत्याने आणि सविस्तरपणे द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करत आहेत. लटनिक यांचे वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नाही. 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल आठ वेळा दूरध्वनीवर संवाद झाला आहे, ज्यात भारत-अमेरिका व्यापक भागीदारीच्या विविध पैलूंवर चर्चा झाली आहे.