लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडी फुटली; तृणमूल नाराज, काँग्रेसचे गणित बिघडवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 18:51 IST2024-06-25T18:50:57+5:302024-06-25T18:51:30+5:30
इंडिया आघाडीची स्थापना करणारे नितीशकुमार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपासोबत एनडीएत गेले होते. यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे वेगळे लढण्याची घोषणा केली होती.

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडी फुटली; तृणमूल नाराज, काँग्रेसचे गणित बिघडवणार
लोकसभा उप सभापती पदाची बोलणी फिस्कटल्याने तब्बल सात दशकांनी पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. उद्या मतदान होणार असून भाजपाने ओम बिर्ला तर काँग्रेसने के सुरेश यांची उमेदवारी दिली आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष खर्गेंच्या निवासस्थानी बैठक होत आहे. उद्याची रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक होत असून या बैठकीपूर्वीच इंडिया आघाडीतील फाटाफूट समोर आली आहे.
इंडिया आघाडीची स्थापना करणारे नितीशकुमार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपासोबत एनडीएत गेले होते. यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे वेगळे लढण्याची घोषणा केली होती. इथेच खरी इंडिया आघाडी फुटली होती. निकाल लागल्यानंतर खर्गेंनी पुन्हा ममतांना इंडिया आघाडीत घेण्याचे प्रयत्न केले होते. परंतू आज लोकसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा आरोप ममता यांच्या पक्षाने केला आहे.
ममता यांचा पुतण्या खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीचे अध्यक्ष पदासाठीची उमेदवारी के सुरेश यांना देताना आमचे मत विचारले गेले नाही. काँग्रेसने परस्पर हा निर्णय घेतला आहे. यामुळे ममता बॅनर्जी आता इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतील असे ते म्हणाले. कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही, संभाषण झाले नाही, दुर्दैवाने हा एकतर्फी निर्णय आहे, असेही ते म्हणाले.
सुत्रांनुसार के सुरेश यांच्या उमेदवारी अर्जावर तृणमूलची सही नाहीय. यामुळे आज रात्री होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीतही तृणमूल सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. अशातच आता अध्यक्ष पदासाठी तृणमूल काय भूमिका घेते याकडे भाजपाचे आणि काँग्रेसचे लक्ष लागले आहे. विश्वासात न घेतल्याने तृणमूलचे खासदार तटस्थ देखील राहू शकतात.