महिला विनयभंगप्रकरणी राजभवनच्या तिघांवर गुन्हा, महिलेस चुकीच्या पद्धतीने रोखल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 13:23 IST2024-05-19T13:20:19+5:302024-05-19T13:23:10+5:30
राजभवनातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने तिच्या विनयभंगप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवले होते, त्यानंतर हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात तीन अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्यात आला.

महिला विनयभंगप्रकरणी राजभवनच्या तिघांवर गुन्हा, महिलेस चुकीच्या पद्धतीने रोखल्याचा आरोप
कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेस चुकीच्या पद्धतीने रोखल्याच्या आरोपाखाली राजभवनच्या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. राजभवनातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने तिच्या विनयभंगप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवले होते, त्यानंतर हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात तीन अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्यात आला.
‘तक्रारदार महिलेला अयोग्यरीत्या रोखणे व तिला २ मे रोजी राजभवन सोडू न दिल्याबद्दल तीन अधिकारी ज्यांची नावे एस.एस. राजपूत, कुसुम छेत्री आणि संत लाल आहेत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, संबंधित तीनही अधिकाऱ्यांच्या भूमिकेची या प्रकरणात आम्ही सखोल चौकशी करू, असे पोलिस म्हणाले. संबंधित महिलेने २ मे रोजी राज्यपाल बोस यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता, त्यानंतर कोलकाता पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला होता.
याआधी नर्तिकेकडून लैंगिक छळाचा आरोप
राज्यपाल बोस यांच्यावर लैंगिक छळाची ही पहिलीच तक्रार नाही. याआधीही त्यांच्यावर नर्तिकेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. एका ओडिसी शास्त्रीय नर्तिकेने दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बोस यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. ही बाब १४ मे रोजी उघडकीस आली. नृत्यांगनाने तक्रारीत म्हटले की, ती परदेश प्रवासाशी संबंधित समस्यांबाबत मदतीसाठी राज्यपालांकडे गेली होती.