मार खाऊनही भाजपा सरकारमध्येच; मुख्यमंत्री-विधानसभाध्यक्ष वादाने राजकारण तापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 10:55 IST2022-03-16T10:50:41+5:302022-03-16T10:55:06+5:30
राबडी देवी यांनी भाजप व मुख्यमंत्री नितीशकुमार दोघांवरही टीका केली.

मार खाऊनही भाजपा सरकारमध्येच; मुख्यमंत्री-विधानसभाध्यक्ष वादाने राजकारण तापले
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांच्यातील सोमवारच्या वादावादीचे परिणाम विधान परिषदेतही पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्या राबडी देवी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला. भाजप लाथा-बुक्क्या खाऊनही सरकारमध्ये कायम आहे, असे म्हणतानाच त्यांनी भाजपचे मंत्री अशोक चौधरी यांना दलाल म्हटले.
राबडी देवी यांनी भाजप व मुख्यमंत्री नितीशकुमार दोघांवरही टीका केली. चौधरी हे सरकारचे दलाल आहेत. ते कधी इकडे असतात तर कधी तिकडे असतात, असे राबडी देवी म्हणताच गदारोळ सुरू झाला. भाजप आ. विजय बिहारी हे या प्रकरणानंतर आपल्याच पक्षाच्या भूमिकेमुळे नाराज आहेत. पद आणि पक्षी पिंजऱ्यात बंद आहेत, या आपल्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
विधानसभा अध्यक्ष फिरकलेच नाहीत
विधानसभा अध्यक्ष खुलेआम संविधानाचे उल्लंघन करीत आहेत, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी केला होता. त्यावर संतप्त होऊन अध्यक्षांनी विचारले होते की, कसे कामकाज चालवायचे ते सांगा. या प्रकारामुळे नाराज झालेले विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा मंगळवारी सभागृहाकडे फिरकले नाहीत. मुख्यमंत्रीही सभागृहापासून दूरच राहिले.