पोलीस ठाण्यासमोरच मुलाने आईला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, मग बनवला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 20:10 IST2024-07-16T20:10:14+5:302024-07-16T20:10:37+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अका तरुणाने पोलीस ठाण्यासमोरच आईवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये सदर महिला ४० टक्के भाजली आहे.

पोलीस ठाण्यासमोरच मुलाने आईला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, मग बनवला व्हिडीओ
उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अका तरुणाने पोलीस ठाण्यासमोरच आईवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये सदर महिला ४० टक्के भाजली आहे. सुमारे पाच मिनिटे आगीत होरपळल्यानंतर घटनास्थळावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी माती आणि पाणी टाकून ही आग शमवली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची गंभीर अवस्था पाहता तिला जेएन मेडियल कॉलेज सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पीडित महिला पोलीस ठाण्यातून बाहेर येताना दिसत आहे. तर तिच्या मागून तिची मुलगा धावत येताना दिसत आहे. त्यानंतर तो पेट्रोलची बाटली काढून आईवर पेट्रोल टाकून तिला आग लावताना दिसत आहे. त्यादरम्यान घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर लोक इकडून तिकडे पळताना दिसत आहेत. तसेच काही पोलीस ही आग शमवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
या घटनेबाबत डीएसपी राजीव द्विवेदी यांनी सांगितले की, या महिलेने तिच्या नातेवाईकांविरोधात विविध तक्रारी पोलिसांकडे दिल्या होत्या. त्याबाबत चौकशीसाठी तिला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. याचदरम्यान, अचानक तिच्या मुलाने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. पीडितेला रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे.