आंध्र प्रदेशात भाऊ विरुद्ध बहीण सामना रंगणार, काँग्रेसने वायएस शर्मिलांकडे दिली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 05:25 PM2024-01-16T17:25:47+5:302024-01-16T17:26:27+5:30
Congress News: काही दिवसांपूर्वीच शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये आल्यानंतर वायएस शर्मिला यांच्याकडे काँग्रेसने आंध्र प्रदेशचं प्रदेशाध्यक्षपद सोपवलं आहे. त्यामुळे येत्या काळात आंध्र प्रदेशमध्ये भाऊ विरुद्ध बहीण असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय. एस. आर. रेड्डी यांच्या कुटुंबामध्ये राजकीय हेव्यादाव्यांमधून फूट पडली होती. त्यानंतर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना त्यांचीच बहीण वायएस शर्मिला यांनी आव्हान दिले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये आल्यानंतर वायएस शर्मिला यांच्याकडे काँग्रेसने आंध्र प्रदेशचं प्रदेशाध्यक्षपद सोपवलं आहे. त्यामुळे येत्या काळात आंध्र प्रदेशमध्ये भाऊ विरुद्ध बहीण असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
या नियुक्तीबाबत काँग्रेसकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. त्यात म्हटलंय की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांन वायएस शर्मिला यांना तत्काळ प्रभावाने काँग्रेसच्या आंध्र प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्त केलं आहे. आतापर्यंत आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळत असलेले रुद्रराजूगिडूगू यांना काँग्रेसच्या कार्यकारिणी समिती (सीडब्ल्यूसी) मध्ये विशेष निमंत्रित सदस्य बनवण्यात आलं आहे.
पक्षामध्ये सहभागी झाल्यानंतर वायएस शर्मिला यांनी सांगितले की, राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत, असं माझे वडील वायएस राजशेखर रेड्डी यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी मी त्या दिशेने काम करेन.
Congress President Shri @Kharge has appointed Smt. @realyssharmila as the President of the @INC_Andhra with immediate effect.
— Congress (@INCIndia) January 16, 2024
Shri @Kharge has also appointed Shri @RudrarajuGidugu, the outgoing PCC President, as a special invitee to the Congress Working Committee. pic.twitter.com/xB2TRTKO19
आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या राजशेखर रेड्डी यांचा एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये एक यात्राही काढली होती. मात्र काँग्रेसच्या हायकमांडशी मतभेद झााल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेसची स्थापना केली होती. मात्र त्यांच्या कुटुंबात मतभेद झाल्यानंतर त्यांची बहीश शर्मिला यांनी विरोधात भूमिका घेतली होती.