'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:00 IST2025-11-19T14:48:51+5:302025-11-19T15:00:42+5:30
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जन सुराज पक्षाच्या पराभवानंतर, प्रशांत किशोर यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते निकालांमुळे नाराज आहेत, त्यांना नीट झोप लागली नसल्याचे त्यांनी सांगितले.

'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचा मोठा पराभव झाला. पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी आता एक मोठे विधान केले आहे. बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून ते नीट झोपू शकले नाहीत असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. पराभव स्वीकारणार नाही आणि बिहारमध्ये मी प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले. "जोपर्यंत तुम्ही पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही हरला नाहीत", असंही ते म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या जन सुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. बिहार निवडणुकीत जन सुराजचा पराभव हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे असे ते म्हणाले.
मागील आठवड्यात निकाल समोर आल्यापासून त्यांना नीट झोप लागली नसल्याचे ते म्हणाले. बिहारच्या राजकीय क्षेत्रात त्यांचे प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.
"आम्ही रोजगार आणि स्थलांतर यासारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली"
यावेळी प्रशांत किशोर यांना निवडणुकीतील निकालावरून प्रश्न केले. यावेळी ते म्हणाले, पक्षाच्या प्रयत्नांना निवडणुकीत यश मिळाले नसले तरी निवडणूक मुद्दे बदलले. जन सुराज यांनी रोजगार आणि स्थलांतर यासारख्या मुद्द्यांवर, जात आणि धर्मापासून दूर जाऊन निवडणूक लढवली.
प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारमध्ये चार प्रमुख मतदार गट आहेत. जातीच्या आधारे मतदान करणारे, धर्माच्या आधारे मतदान करणारे, लालू यादव यांच्या परत येण्याच्या भीतीने एनडीएला मतदान करणारे आणि भाजपच्या भीतीने विरोधकांना मतदान करणारे.' जन सुराज पहिल्या आणि दुसऱ्या गटावर प्रभाव पाडण्यात यशस्वी झाले, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या गटावर प्रभाव पाडण्यात अयशस्वी झाले.
"मी हार मानत नाही..."
निवडणुकीतील पराभवावर बोलताना प्रशांत किशोर म्हणाले,"मी हार मानत नाही." भाजपकडेही एकेकाळी फक्त दोन खासदार होते. जेव्हा तुम्ही पक्ष स्थापन करता तेव्हा असे निकाल येऊ शकतात."आम्ही जात आणि धर्माचे विष पसरवले नाही. आम्ही पुन्हा प्रयत्न करू."मी बिहारसाठी १० वर्षे समर्पित केली आहेत.