"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:53 IST2025-11-20T12:51:47+5:302025-11-20T12:53:15+5:30
Shashi Tharoor Praised PM Modi: एका पुरस्कार सोहळ्यातील कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजर होते. त्यांच्या भाषणातील मुद्दे सांगत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी त्यांचे कौतुक केले. यावरून आता काँग्रेसमधून त्यांना लक्ष्य केले जात आहे.

"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
Shashi Tharoor News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. यामुळे तर्कविर्तक सुरू झाले, तर काँग्रेसच्या नेत्यांनी थरूर यांनाच उलट सवाल केले. काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सुपुत्र संदीप दीक्षित यांनी थरुर यांना तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबला आहात? असा थेट सवाल केला.
रामनाथ गोयंका व्याख्यानमालेत पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणाचे शशी थरूर यांनी कौतुक केल्यानंतर काँग्रेसच्याच नेत्यांनी त्यांना उलट सवाल केले आहेत. काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी थरूर यांच्यावर हल्ला चढवत म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाची धोरणे व्यवस्थितपणे काम करत आहे, जर त्यांना वाटत आहे, तर ते भाजपमध्ये का जात नाहीयेत?"
मग तुम्ही काँग्रेसमध्ये का आहात?
संदीप दीक्षित म्हणाले, "शशी थरूर यांची समस्या अशी आहे की, मला वाटतं त्यांना देशाबद्दल फार माहिती नाही. जर तुमच्या मते काँग्रेसच्या धोरणाविरोधात जाऊन कुणीतरी या देशासाठी चांगले काम करत आहे, तर मग तुम्ही त्यांचीच धोरणे स्वीकारली पाहिजे."
"तुम्ही काँग्रेसमध्ये का थांबला आहात? फक्त खासदार आहात म्हणून तर तुम्ही काँग्रेसमध्ये थांबलेला नाहीत ना? जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की, भाजप किंवा पंतप्रधान मोदींची धोरणे तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षापेक्षा चांगली आहेत, तर तुम्ही त्याबद्दल स्पष्टपणे बोललं पाहिजे. जर तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकत नसाल, तर तुम्ही ढोंगी आहात", अशी टीका संदीप दीक्षित यांनी शशी थरूर यांच्यावर केली.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदी यांचे फोटो आणि भाषणातील काही मुद्दे सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या विकासासाठी नियोजनात्मक विचार मांडला. भारत आता फक्त उदयास येत असलेला बाजार नाहीये, तर जगासाठी उदयोन्मुख मॉडेल आहे. त्यांनी देशाच्या आर्थिक मजबुतीवर जोर दिला. सतत निवडणुकीच्या विचारात असतो, असा आरोप माझ्यावर होतो, पण मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी भावनात्मक मोडमध्ये असतो, असेही मोदी म्हणाल्याचे थरूर यांनी म्हटले होते.