'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 18:17 IST2025-10-02T18:17:05+5:302025-10-02T18:17:33+5:30
जर तुम्ही (राहुल गांधी) परदेशात भारताचा अपमान कराल, तर समजून घ्या की तुम्हाला देशात जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, तेवढ्या देखील पुन्हा मिळणार नाहीत. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो.

'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कोलंबिया येथील वक्तव्यांनंतर, आता भारतीय जनात पक्षाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले, त्यांनी विजयादशमीच्या शुभ प्रसंगी भारतातील जनतेला शुभेच्छा दिल्या असत्या तर बरे झाले असते, पण ते भारतावर हल्ला करत आहेत. ते देशातही असेच करतात आणि परदेशातही.
जर तुम्ही (राहुल गांधी) परदेशात भारताचा अपमान कराल, तर समजून घ्या की... -
रविशंकर प्रसाद म्हणाले, "राहुल गांधी यांनी कोलंबियामध्ये असे वक्तव्य केले की, भारतात लोकशाही नाही, लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. खरे तर, जर कुणी व्यक्ती देशाच्या विकासासंदर्भात, भाजपसंदर्भात आणि पंतप्रधान मोदींसंदर्भात सर्वाधिक स्वातंत्र्य घेऊन अपशब्द वापरत असेल, तर ती व्यक्ती म्हणजे राहुल गांधीच आहेत. त्यांना देशाविरुद्ध बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. ते भारतात आणि परदेशातही तथ्यहीन बोलतात. जर तुम्ही (राहुल गांधी) परदेशात भारताचा अपमान कराल, तर समजून घ्या की तुम्हाला देशात जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, तेवढ्या देखील पुन्हा मिळणार नाहीत. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो.
काय म्हणाले राहुल गांधी? -
भारताकडे जगाला देण्यासाठी खूप काही आहे. याबद्दल अत्यंत आशावादी आहे. भारतीय व्यवस्थेत काही त्रुटी आणि धोके आहेत, ज्या भारताने दूर केल्या पाहिजेत. सर्वांत मोठा धोका म्हणजे लोकशाहीवर सतत होणारा हल्ला. भारत हा त्याच्या सर्व देशवासींमध्ये संवादाचे केंद्र आहे. वेगवेगळ्या परंपरा, धर्म आणि विचारांना जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था.
दुसरे म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारी विभागणी. येथे अंदाजे १६-१७ वेगवेगळ्या भाषा आणि धर्म आहेत. या विविध परंपरांना व्यक्त होऊ देणे हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चीन जे करतो ते आपण करू शकत नाही - लोकांना दडपून टाकणे आणि हुकूमशाही व्यवस्था चालवणे. आपली व्यवस्था ते सहन करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.